
मुंबई : भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक ३ डिसेंबरला होणार आहे. मात्र, २ डिसेंबरला म्हणजेच सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होणार आहे. दिल्लीतून दोन निरीक्षक मुंबईत येणार असून ते आमदारांशी चर्चा करून अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करतील, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. शिंदेंची शिवसेना गृह खात्यावर अडून बसली असतानाच, पत्रकार परिषदेत मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत मौन बाळगले.
महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नाही. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शहा घेतील. मी माझी भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल. मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या होत्या. आम्हाला जनतेने प्रचंड यश दिले. लोकांना जी आश्वासने आम्ही दिली आहेत, ती आम्हाला पूर्ण करायची आहेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने लोकांशी आम्ही बांधील आहोत आणि ती बांधिलकी जपायची आहे. मला काय मिळाले आणि कोणाला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे, हे महत्त्वाचे आहे. जनतेने आम्हाला भरभरून दिले आहे. आमच्यावर मतांचा वर्षाव केला आहे. त्यामुळे आता आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
गृह खात्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल एकनाथ शिंदे यांना तीन वेळा प्रश्न विचारण्यात आला, मात्र शिंदे यांनी त्यावर बोलणे टाळले. राज्यात सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नसताना, शिंदे अचानक त्यांच्या मूळ गावी दरे येथे गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते आराम करण्यासाठी गावी गेल्याचे सांगण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी रविवारी दरे गावात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सत्ता स्थापन होत असताना गावी जायचे नाही का? असा सवाल त्यांनी केला. मी नेहमीच गावी येत असतो, असेही ते म्हणाले.
“आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नाही. विरोधकांना काही काम राहिले नाही. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता होण्याइतके संख्याबळ नाही. झारखंडमध्ये त्यांचा विजय झाला. लोकसभेतही ते जिंकले, मग तेव्हा ईव्हीएम मशीन चांगले होते का?” असा सवाल त्यांनी विरोधकांना केला आहे.
मुख्यमंत्री ठाण्यात दाखल
सत्ता स्थापनेचा तिढा न सोडवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या आपल्या मूळ गावी गेल्याने हा पेच आणखीनच वाढला आहे. त्यातच मुख्यमंत्री आजारी असल्याची बातमी शनिवारी आली होती. मात्र, आता ते ठणठणीत बरे झाले असून रविवारी सायंकाळी ठाणे येथील आपल्या निवासस्थानी ते परतले आहेत. दीपक केसरकर यांनी त्यांची भेटही घेतली.
गृहमंत्रीपदावर बैठकीत निर्णय
शिवसेना गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहे का? असे विचारल्यावर शिंदे म्हणाले की, “या सर्व गोष्टीबाबत चर्चा होईल. चर्चांमधून अनेक गोष्टींवर मार्ग निघेल. तसेच अनेक गोष्टी त्यामधून सुटतील. अमित शहा यांच्यासोबत आमची एक बैठक झाली आहे. आता आम्ही तिघे बैठक घेऊ. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येतील. मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमन मॅन म्हणून काम केल्यामुळे मी मुख्यमंत्री व्हावे, ही लोकांची भावना स्वाभाविक आहे.”
श्रीकांत शिंदेंबाबत चर्चा
उपमुख्यमंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. आमची अमित शहांसोबत एक बैठक झाली आहे. आता तीनही पक्षांच्या नेत्यांची दुसरी बैठक लवकरच होणार आहे. त्या बैठकीत चर्चा होऊन महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.