मोदी सरकारला उखडून टाका; शरद पवार यांचा घणाघात

पुण्यात महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचा मेळावा शनिवारी रात्री पुण्यात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
मोदी सरकारला उखडून टाका; शरद पवार यांचा घणाघात
@ANI

राजा माने/मुंबई : यूपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. आम्ही त्यावेळची स्थिती जाणून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांचे तब्बल ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आज देशात रोज ६० ते ६५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. परंतु मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही. या अगोदर शेतकऱ्यांनी उन्हातान्हात, थंडी, पावसात दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन केले. त्यावेळी ते आंदोलन चिरडले. तसेच आताही शेतकरी आंदोलन करीत आहेत. परंतु त्यांचा प्रश्न सोडविला जात नाही. त्यामुळे अशा शेतकरीविरोधी सरकारला शेतातील तणाप्रमाणे उखडून टाका, असा हल्लाबोल ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’चे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

पुण्यात महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचा मेळावा शनिवारी रात्री पुण्यात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे आमदार सचिन अहिर, खा. सुप्रिया सुळे, काँग्रेस खा. चंद्रकांत हंडोरे यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसदीय लोकशाही मजबूत केली आणि हा देश प्रगतीच्या दिशेने कसा वाटचाल करेल, यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून विकासाला गती दिली. त्यामुळे देश आज यशोशिखरावर पोहोचला गेला. नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा कशी वाढविली, हे सारे जग मान्य करते. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात माइक घेतला की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करीत आहेत. त्यामुळे अशा सरकारला आता उखडून फेकण्याची वेळ आली आहे.

भारत देश लोकशाही मूल्यांना मानणारा देश आहे. मात्र, देशात संविधानाला पायदळी तुडविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे गेल्या १० वर्षांत संविधानावर आधारित लोकशाहीची चिंता वाढली आहे. यासोबत राज्यांबद्दलची भूमिकादेखील असहकाराची आहे. हे सरकार एकीकडे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत आहे आणि दुसरीकडे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांनाच आपल्यासोबत घेऊन ठोकशाहीचे राज्य करीत आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. अशा या अतिरेकी सरकारला आता जनतेने धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असेही पवार म्हणाले.

यावेळी इंडिया फ्रंटच्या इतर सदस्यांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, आता देशात आणि राज्यात परिवर्तनाची वेळ आली आहे. त्यामुळे मस्तवाल सत्ता उलथून टाकण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोदींची गॅरंटी खोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाची गॅरंटी देत आहेत. पण त्यांची ही गॅरंटी खोटी आहे. त्यांनी दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, १५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते. महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या १० वर्षांत ते काहीही करू शकले नाहीत. त्यामुळे मोदींची गॅरंटी खोटी आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in