तिच्यावर अत्याचार कर आणि मारून टाक! अल्पवयीन विद्यार्थ्याने वर्गातील मुलीची दिली १०० रुपयांना सुपारी

विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २२ जानेवारी रोजी घडला.
तिच्यावर अत्याचार कर आणि मारून टाक! अल्पवयीन विद्यार्थ्याने वर्गातील मुलीची दिली १०० रुपयांना सुपारी
प्रतिकात्मक छायाचित्र
Published on

दौंड : विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २२ जानेवारी रोजी घडला. पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे वर्गातील मुलीने शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात ठेवून एका अल्पवयीन विद्यार्थ्याने तिची सुपारी दिली. ही बाब शिक्षकांना समजल्यानंतरही शाळेची बदनामी होऊ नये, यासाठी शाळा प्रशासनाने हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापकांसह वर्गशिक्षक व शिक्षिका यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी सही केली होती. हे त्याच वर्गातील एका विद्यार्थिनीने पाहिले व तिने ही गोष्ट वर्गशिक्षिकेला सांगितली. खोट्या सहीची माहिती शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्याने तक्रार करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली.

मुलाने ज्या विद्यार्थ्याला सुपारी दिली, त्याने हा सर्व प्रकार अल्पवयीन विद्यार्थिनीला येऊन सांगितला. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने आपल्या पालकांना याची माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी शाळेत जाऊन वर्गशिक्षक, सुपरवायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र, शाळा प्रशासनाने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट दौंड पोलीस ठाण्यात धाव घेत शाळा प्रशासनाविरोधात फिर्याद दिली.

मुख्याध्यापकासह दोघांवर गुन्हा दाखल

शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून हा धक्कादायक प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीनेच मुलाची बदनामी करण्याच्या हेतूने सुपारी दिल्याचे सांगत तिला मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि शिक्षिका अशा तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in