महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला; देशातील पहिले पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून हलणार

२०१८ मध्ये देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्गमधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्सजवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहळण्याची या प्रकल्पात योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राची पाणबुडी गुजरातमध्ये प्रगटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला; देशातील पहिले पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून हलणार

मालवण : महाराष्ट्रातील आजवर अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ घेतलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची माहिती मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्पाला लागलेली नकारघंटा अजूनही तशीच आहे.

मागील १०-१५ वर्षांत सी वर्ल्ड, हाऊस बोट, पर्यटनासाठी विराट युद्धनौका, अशा एक ना अनेक पर्यटन प्रकल्पांचे गाजर सिंधुदुर्गवासीयांना दाखविण्यात आले. परंतु दुर्दैवाने यातील एकही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. २०१८ मध्ये देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्गमधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्सजवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहळण्याची या प्रकल्पात योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राची पाणबुडी गुजरातमध्ये प्रगटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

समुद्राखालचे अंतरंग दाखविणारा प्रकल्प

भारताच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटनासाठी पाणबुडीची संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली होती. या प्रकल्पासाठी ५६ कोटी निधी मंजूर झाला. त्यातील काही निधी वितरितही झाला होता; मात्र वेळोवेळी बदलणारे मंत्री, बदलते सचिव आणि वर्षाला बदलणारे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक या गोंधळामुळे सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. सिंधुदुर्गात साकारल्या जाणाऱ्या पाणबुडी प्रकल्पात कर्मचाऱ्यांसह २४ प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून न्याहाळता येणार होती. या प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी ५ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तर १०० ते १५० कोटींची उलाढाल होणार होती.

गुजरातच्या द्वारका येथे होणार

महाराष्ट्रातील २०१८ सालातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्रविश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राज्य शासन राबवणार होता. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in