पर्यटकांचे आकर्षण माळशेज घाट!

नाणेघाट, भैरवगड, सिद्धगडावर पर्यटकांचा ओढा; घाटातील धोका कायम
पर्यटकांचे आकर्षण
माळशेज घाट!

मुरबाड: पावसाची रिमझिम, धुक्याची दुलई, स्वच्छंद आणि मनमोहक धबधबे, निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल आणि आल्हाददायी गारवा अनुभवण्यासाठी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटाचे आकर्षण पर्यटकांना मोठ्या प्रमाणात असते. पावसाळ्याची चाहूल लागल्यापासून पर्यटकांची पावले माळशेज घाटाकडे आपोआप वळायला लागतात. पर्यटकांचा उच्चांक गाठणाऱ्या माळशेज घाटात महाराष्ट्रातील कानाकोपाऱ्यातून पर्यटक दरवर्षी जून-जुलैमध्ये भेट देतात. यंदाच्या पावसाळ्याला जूनअखेरीस सुरुवात झाली असली तरी आता माळशेज घाट पर्यटकांनी गजबजायला सुरुवात झाली आहे. पावसाला होताच, पर्यटकांनी शनिवार, रविवारी माळशेज घाटाचा मनसोक्त आनंद घेण्यास सुरुवात केली आहे.

मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट हे अभयारण्याचे ठिकाण आहे. मुरबाडपासून ६० किलोमीटर, कल्याणपासून ९० किलोमीटर तसेच जुन्नर-औतुर आळेफाट्यापासून ३० किलोमीटर अंतरावर वेड्यावाकड्या वळणासोबत असंख्य धबधब्यांच्या सानिध्यात निसर्गरम्य सौंदर्यात नटलेल्या पर्यटन स्थळांमध्ये माळशेज घाटाचा समावेश होतो. माळशेज घाटाला लागून अजापर्वत, नाणेघाट, गणपतीलेणी, गोरखगड, भैरवगड, भीमाशंकर, हरिश्चंद्र गड, सिद्धगड, शिवनेरीगड अशी इतिहासकालीन पर्यटनस्थळे आहेत. माळशेजघाट थिदवी येथील काळू धबधबा, गोवा गोर्कण येथील धबधबे पर्यटकांना भुरळ घालण्याचे काम नित्यनेमाने करत असतात. माळशेज घाटात मोर, कोकीळ, पोपट, माकडे तसेच परदेशी पक्षीदेखील पर्यटकांच्या नजरेस पडतात. माळशेज घाटातील रानमेवा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून आवळे, आंबे तसेच पावसाळ्यात रानभाज्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

माळशेज घाटातील रस्ता वेड्यावाकड्या वळणाचा आहे. घाटात अनेक ठिकाणी पिकनिक पॉईंट उभारण्यात आले आहेत. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या माकडांची झुंबड असते. पावसाळ्यामधील पर्यटकांसाठी घाटात मके, वडापाव, चहा, मॅगी, शेंगदाण्याची मेजवानी असते. मुरबाड शहरातून मटण भाकरी, मच्छी घेऊन माळशेज घाटात वनडे पिकनिक करणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

माळशेज घाटात घनदाट धुक्याची चादर पसरलेली असते. त्यात एका बाजूला खोल दरी आणि निमुळता रस्ता यामुळे वाहनचालक, प्रवाशांमध्ये भीतीचे सावटदेखील असते. माळशेज घाटातील रानमेवा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आवळे, आंबे तसेच पावसाळयात रानभाज्या वाहनधारकांचे आकर्षण केंद्र ठरले आहेत. मोरोशी फागुळगव्हाण, थिदवी परिसरात शेकडो महिला-पुरुष रानमेवा विक्री करून आपला उदरनिर्वाह करत असतात. घाटाच्या पायथ्याला थितबी नावाचे आदिवासी गाव वास्तव्यास आहे. इथून वाटाड्या घेतल्यास, थितबी धबधब्यापर्यंत जाता येते हा अनुभव थ्रिलिंग करणारा आहे. धबधब्याच्या खाली मोठा जलाशय असून तिथल्या खोल पाण्यात जलक्रीडेचा मनसोक्त आनंद घेता येतो. मुरबाडचा माळशेज घाट जेवढा महाराष्ट्रात पर्यटकांचा आवडता स्पॉट असला तरी तेवढाच जास्तीत जास्त बळी घेणारा घाट म्हणून प्रचलित आहे. घाटात एसटी महामंडळाची बस खोलदरीत कोसळून २९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हा घाट पर्यटकांसाठी शापीतच असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत या घाटाने अनेकांचे प्राण घेतले आहेत. अशा पर्यटकांच्या उत्साहाला साद घालणारा माळशेज घाट रस्ता अपूर्णच आहे.

दरडींच्या सावटाखाली असलेले पर्यटनस्थळ
पर्यटन विकासाच्या नावाखाली माळशेज घाटात कोट्यवधी रुपये दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्च करण्यात येतात. मात्र, तरीही येथील दरडी कोसळण्याचे सत्र दरवर्षी पावसाळ्यात सुरू होते. सुसज्ज पार्किंग व्यवस्था, संरक्षक कठडे, चकाचक रस्ता, यासाठी आजमितीला करोडो रुपये खर्च करूनही येथील अपघात रोखता आलेले नाहीत. निकृष्ट कामांमुळे तर, काही ठिकाणी संरक्षण कठडेदेखील कोसळून पडल्याच्या घटना येथे घडलेल्या आहेत. यामुळे हा माळशेज घाट प्रवासाकरिता अंत्यत धोकादायक झालेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींच्या सावटाखाली अगदी जीव धोक्यात घालून येथून प्रवासी, वाहनचालकांना माळशेज घाट पार करावा लागतो आहे.

सध्या माळशेज घाट फक्त मजेसाठीच
मुरबाड माळशेज घाटात उपप्रदेशिक हायवे पोलीस, आरटीओ तसेच टोकावडा पोलीस ठाण्याचे पोलीस दिवसरात्र पर्यटक, प्रवाशांना सुरक्षा देण्यात व्यग्र असतात. वाहतूक पोलीस अधिकारी विसपुते, पोलीस कर्मचारी संजय घुडे त्यांचे सहकारी त्यांचे काम चोखपणे पार पाडत आहेत. त्यामुळे दुर्देवी घटनांचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. माळशेज घाटात काही वर्षांपूर्वी पर्यटकांकडून होत असलेल्या धिंगाण्याला पोलीस आणि गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आळा घातला आहे. त्यामुळे सध्या पर्यटक येथे माळशेज घाटात मौजमजा करण्यासाठीच येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in