Satara : महाबळेश्वरमध्ये पर्यटकाची हत्या; चारही आरोपींना अटक

महाबळेश्वरजवळील भोसे, ता. महाबळेश्वर गावामध्ये एका २५ वर्षीय पर्यटकाची चौघा स्थानिक रहिवाशांनी मिळून बेदम मारहाण करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
Satara : महाबळेश्वरमध्ये पर्यटकाची हत्या; चारही आरोपींना अटक
Satara : महाबळेश्वरमध्ये पर्यटकाची हत्या; चारही आरोपींना अटक
Published on

कराड : महाबळेश्वरजवळील भोसे, ता. महाबळेश्वर गावामध्ये एका २५ वर्षीय पर्यटकाची चौघा स्थानिक रहिवाशांनी मिळून बेदम मारहाण करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 'घराच्या दिशेने डोकावल्याच्या' संशयावरून हा अमानुष हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

या घटनेत अक्षय रमेश जाधव (वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) या तरुणाचा मृत्यू झाला असून पाचगणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चारही संशयित आरोपींना अटक केली. सूर्यकांत गोळे (रा. भोसे), अविनाश भोसले (रा. बावधन), राहुल राजपुरे (रा. कनुर) आणि अमोल वाडकर (रा. चिखली, महाबळेश्वर) या चौघांना पाचगणी पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे जिल्ह्यातील भिगवण येथून अक्षय जाधव हा त्याच्या मित्रांसह भोसे येथील 'अतिथी व्हिला हॉटेल'मध्ये पर्यटनासाठी आला होता. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अक्षयने जास्त मद्यप्राशन केल्यामुळे मित्रांनी त्याला खोलीत झोपवले आणि ते टेरेसवर गेले. दरम्यान, दारूच्या नशेत अक्षय खोलीबाहेर पडला. तो आरोपींच्या घराच्या बाजूला गेला असता, त्यांनी अक्षय घरात डोकावत असल्याच्या संशयावरून त्याला लाकडी काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण केली. हॉटेलबाहेर गर्दी पाहून मित्रांनी तिथे धाव घेतली, तेव्हा अक्षय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला पाचगणी, वाई आणि नंतर बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी गुरुवारी पाचगणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जी. पवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in