कराड : येथील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे येथील टोल नाक्यावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीकडून होत असलेल्या गंभीर हलगर्जीपणाचा आणखी एक बळी गेला असून, कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना न करता खोलवर खोदलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तरुण ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. सुनिल केचप्पा शिंगाडे असे मृत चालकाचे नाव आहे. या प्रकरणी तळबीड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
तासवडे येथील जुनी टोलनाक्याची इमारत पाडल्यानंतर या परिसरात महामार्ग रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. गेल्या वर्षभरात सातारा ते कराड या लेनवर सुमारे १२ ते २० फूट खोल खोदकाम करून नव्या टोलनाक्याच्या उभारणीचे काम सुरू आहे. सध्या वाहतूक वळवून कराड ते सातारा लेनच्या बाजूने गुरु. १५ जानेवारीपासून नव्याने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. याच ठिकाणी गुरुवार मध्यरात्री ते शुक्रवार पहाटेच्या सुमारास महामार्गावर कोणतीही सूचना फलक, रिफ्लेक्टर किंवा सुरक्षा उपाय न लावता खोदकाम सुरू असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर दोन रिकाम्या ट्रॉलींसह थेट खोदलेल्या खड्ड्यात पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला.अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाच्या अंगावरच पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.