धुळवडीला गालबोट; राज्यभरात आठ जणांचा बुडून मृत्यू

राज्यात शुक्रवारी धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच काही ठिकाणी या सणाला गालबोट लागले.
धुळवडीला गालबोट; राज्यभरात आठ जणांचा बुडून मृत्यू
Published on

मुंबई : राज्यात शुक्रवारी धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच काही ठिकाणी या सणाला गालबोट लागले. राज्यभरात रंगोत्सवादरम्यान ठिकठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. बदलापुरात चौघांचा, उल्हासनगरमध्ये एकाचा, तर पिंपरी चिंचवड परिसरात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला.

बदलापूरला चार मुलांचा बुडून मृत्यू

होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच बदलापूरमध्ये धुळवडीला गालबोट लागले. बदलापूरला अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी उल्हास नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

शुक्रवारी दुपारी २ वा. च्या सुमारास बदलापूर पूर्वेकडील चामटोली गावाजवळ उल्हासनदी पात्रात ही घटना घडली. सकाळी धुळवड खेळल्यानंतर बदलापूर पूर्वेकडील पोद्दार सोसायटीत राहणारे आर्यन मेडर (१६) आर्यन सिंग (१५), सिद्धार्थ सिंग (१६), ओम सिंग तोमर (१५) हे चौघे मित्र दुपारी पोहण्यासाठी नदीत गेले होते. या भागात पाणी खोल असून पाण्याचा अंदाज न आल्याने आर्यन मेडर हा बुडू लागला. त्यावेळी इतर मित्र त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी आर्यन सिंग, सिद्धार्थ सिंग व ओम सिंग तोमर हे तिघेही पाण्यात बुडाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलानेही घटनास्थळी धाव घेतली. या चारही मुलांचे मृतदेह स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढले. दरम्यान, याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुडालेल्या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्याची माहिती कुळगाव पोलीस ठाण्याचे स. पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली. हे चारही मित्र दहावीची परीक्षा देत होते. त्यांचे शेवटचे दोन पेपर बाकी होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पोद्दार संकुल परिसरात शोककळा पसरली आहे.

उल्हासनगरच्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

उल्हासनगर : रंग काढण्यासाठी आपल्या वडिलांसोबत नदीवर गेलेल्या हर्ष चव्हाण (११) या मुलाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. उल्हासनगरातील कॅम्प ५ मध्ये राहणारा हर्ष हा धुळवडीनंतर दुपारच्या सुमारास आपल्या वडिलांसोबत बदलापूरच्या शांतीसागर रिसॉर्टच्या मागील उल्हास नदीवर गेला होता. अंगावरील रंग काढण्यासाठी तो नदीत उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. वडिलांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र पाण्याच्या प्रवाहाने तो बुडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना पिंपरी-चिंचवड येथील दिल्ली रोड भागातील किन्हई गावात घडली. चिखली गावातील तिघे जण नदीत पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने या तिघांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in