Nashik Accident : बस-ट्रकचा भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू

रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नव्हते. गंभीर परिस्थिती पाहता चांदवड शहरातील अनेक खासगी डॉक्टर मदतीसाठी पुढे आले.
Nashik Accident : बस-ट्रकचा भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड जवळच्या राहुड घाटात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज (३० एप्रिल) सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात ७ ते ८ प्रवाशांना आपला जीव गमावला लागलाय. तर, अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. बसचा टायर फुटल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

बसचा टायर फुटल्याने अनियंत्रित बस ट्रकला धडकून हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती नाही. ही बस कोणत्या मार्गावरील होती हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. तथापि, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात ट्रॉमा केअरमध्ये सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले. रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नव्हते. गंभीर परिस्थिती पाहता चांदवड शहरातील अनेक खासगी डॉक्टर मदतीसाठी पुढे आले.

मुंबई-आग्रा महामार्गावर आणि जवळपासच्या परिसरात सातत्याने अपघात होत असतानासुद्धा उपजिल्हा रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यात धक्कादायक म्हणजे रुग्णालयात जखमींना आणण्यासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती. कारण, रुग्णवाहिकेच्या चालकांमध्ये असलेल्या वादामुळे ती नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली.

कर्मचाऱ्यांचा आभाव

गेल्या पाच वर्षांपूर्वी रुग्णालयाला दिलेली डायलिसिस मशीनसारखी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणेही कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे वापरात आलेली नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करून आणि आश्वासन देऊनही अपुऱ्या कर्मचाऱ्यांची समस्या सोडविण्याबाबत कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आली नाहीत.

निष्काळजी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन

या भीषण अपघातामुळे घटनेच्या वेळी उपजिल्हा रुग्णालयात गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी निष्काळजी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in