
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या भागात प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सोमवारी दिली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामार्फत नवीन सरकारी महाविद्यालय स्थापना करण्यात येणार आहे. तलाठी भरतीप्रमाणेच इतर पदांबाबात संधी देण्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांना तलाठी भरतीसाठी संधी दिली होती. त्याचप्रमाणे इतर पदांच्या भरतीबाबत शासन त्यांना संधी देता देईल का, उच्च शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणार का, सरकारी महाविद्यालय स्थापन करणार का, असा प्रश्न निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी प्रश्न विचारला. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री बावनकुळे यांनी उत्तर दिले.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी, नोकरीसाठी मुभा देण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. त्या भूमिकेनुसार सीमाभागातील उमेदवारांना तलाठी भरतीसाठी सामावून घेण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. सीमाभागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी सीमाभागात प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र निर्माण केली जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.