नांदेड, यवतमाळसह पाच विमानतळांचे लवकरच हस्तांतरण; जिल्हास्तरावर उद्योग भवन उभारणार: उद्योगमंत्री उदय सामंत

नांदेड येथील विमान सेवा आणखी तत्पर व सुकर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुंबई विमानतळावरची वाढती गर्दी लक्षात घेता.
नांदेड, यवतमाळसह पाच विमानतळांचे लवकरच हस्तांतरण; जिल्हास्तरावर उद्योग भवन उभारणार: उद्योगमंत्री उदय सामंत
@samant_uday
Published on

भास्कर जामकर/नांदेड

नांदेड येथील विमान सेवा आणखी तत्पर व सुकर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुंबई विमानतळावरची वाढती गर्दी लक्षात घेता. पार्किंग समस्या ही सोडविणे शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे नांदेड, यवतमाळ सह पाच विमानतळाचे लवकरच शासन खासगी कंपनीकडून स्वतःकडे हस्तांतरण करणार आहे, तसेच नांदेडसाठी ३८ कोटी, परभणीसाठी २९ कोटी तर हिंगोली जिल्ह्याला १६ कोटी रुपये दिल्याची माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे दिली.

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत हे शुक्रवारी नांदेड व परभणीच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी उद्योग भवनात विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नांदेड विमानतळ व तेथील सुविधांबद्दल विस्तृत चर्चा केली. नाईट लँडिंगसह अत्याधुनिक सोयी-सुविधांबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन नांदेडसह लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच खासगी कंपनीकडून काढून घेतले जाणार आहेत. खासगी कंपन्यांना देण्यात आलेल्या नोटिसांचा कालावधी देखील पूर्ण होत आला आहे. लवकरच एमआयडीसीकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दावोसच्या जागतिक परिषदेला त्यांनी यशस्वी परिषद संबोधले. जवळपास पंधरा हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहेत. त्यातून नांदेडमध्ये एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

उद्योगांना चालना देण्यासाठी सर्व जिल्ह्यांत उद्योग भवन उभारणार असून, औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी, रस्ते, पथदिवे अशा भौतिक सुविधा देण्यासाठी प्राधान्य देत आहोत. त्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. नांदेडसाठी ३८ कोटी, परभणीसाठी २९ कोटी तर हिंगोली जिल्ह्याला १६ कोटी रुपये दिले आहेत.

चार्टर विमानसेवेला प्राधान्य

नांदेडसह लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती हे विमानतळ कंपनीकडून काढून घेण्याबाबत त्यांना नोटीस दिल्या आहेत. त्या नोटिसांचा कालावधी देखील संपुष्टात आला असून, लवकरच सदर विमानतळ हे एमआयडीसीकडे हस्तांतरित केले जातील. त्यानंतर तिथे नाइट लँडिंगसह अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नियमित देखभाल, दुरुस्तीसह उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना प्रस्तावित आहेत. यामध्ये प्रामुख्याने चार्टर विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच नांदेड-मुंबई विमानसेवाही लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in