दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; राजगोपाल देवरा महसूल खात्यात, तर असीमकुमार गुप्ता नगरविकासमध्ये

दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; राजगोपाल देवरा महसूल खात्यात, तर असीमकुमार गुप्ता नगरविकासमध्ये

ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांची मदत आणि पुनर्वसन विभागात बदली झाली

राज्य सरकारने बुधवारी दहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यानुसार नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांची बदली महसूल विभागात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर झाली आहे, तर मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याकडे नगरविकास विभाग १ ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी नगरविकास विभाग एकची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याकडे होती.

राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती केल्यानंतर राज्य सरकारने प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू केले आहेत. त्यानुसार बुधवारी महसूल आणि नगरविकास विभागात नव्या सचिवांच्या बदल्या करण्यात आल्या. ज्येष्ठ अधिकारी डॉ. नितीन करीर यांची बदली वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून केली होती, मात्र त्यांच्याकडे महसूल विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यामुळे महसूल विभागात आता राजगोपाल देवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांची मदत आणि पुनर्वसन विभागात बदली झाली आहे.

दरम्यान, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांची कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्ध खात्यात, प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांची पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागात, संजय खंदारे यांची पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवपदी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची नियोजन विभागात विकास आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आर. एस. जगताप यांची यशदाच्या उपमहासंचालकपदी, तर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in