वैद्यकीय मदत न मिळाल्याने भररस्त्यात आदिवासी महिलेची प्रसुती; जळगावातील प्रकार, नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

वैद्यकीय मदत न मिळाल्याने भररस्त्यात आदिवासी महिलेची प्रसुती; जळगावातील प्रकार, नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

जळगाव जिल्ह्यात सामान्य माणसाला आरोग्य सेवा देण्यात प्रशासन कसे कमी पडते याचा संतापजनक प्रकार चोपडा तालुक्यात सोमवारी रात्री घडला आहे. वारंवार मागणी करून देखील आरोग्य सेवा मिळाली नसल्याने एका आदिवासी महिलेची प्रसुती ही रस्त्यात झाली.
Published on

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सामान्य माणसाला आरोग्य सेवा देण्यात प्रशासन कसे कमी पडते याचा संतापजनक प्रकार चोपडा तालुक्यात सोमवारी रात्री घडला आहे. वारंवार मागणी करून देखील आरोग्य सेवा मिळाली नसल्याने एका आदिवासी महिलेची प्रसुती ही रस्त्यात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी लाडक्या बहिणींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्या बद्दल तीव्र संताप नवशक्तिशी बोलताना व्यक्त केला.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, चोपडा तालुक्यात बोरमई हे आदिवासी गाव असून सोमवारी रात्री या गावातील महिलेला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या. या वेदना सुरू होताच या महिलेच्या नातेवाईकांनी आशा वर्करशी संपर्क करत मदत मागितली, पण मदत मिळाली नाही. दुसरीकडे या महिलेच्या प्रसुती वेदना वाढत होत्या. अखेर या महिलेच्या पतीने दुचाकीवरून तिला जवळच्या शासकीय रूग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. तो पर्यंत महिलेस कळा येण्यास सुरुवात झाली आणि रस्स्त्यात तिची प्रसुती झाली.

याच वेळी जवळच एक म्हातारी आजी होती ती चटकन देवासारखी धावून आली आणि तिने या महिलेला मदत केली. ही घटना घडत असताना रोहिणी खडसे यांनी स्वत: रूग्णवाहिकेसाठी फोन केले. परंतु तासभर वाट पाहून देखील रूग्णवाहिका आली नाही अथवा कुणीही आले नाही. या महिलेला वैद्यकीय मदत मिळाली नाही. महिला रस्त्यावर पडून होती. आजीबाई मदतीला आल्या नसत्या तर या महिलेचे काय झाले असते, तिच्या जिवाचे बरेवाईट झाले असते तर याची जबाबदारी कुणाची असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला.

दरम्यान या प्रकाराने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रीया आल्या आहेत. अनेकांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली.

चौकशी समितीची नेमणूक

दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी बुधवारी चोपडा येथे भेट देत या प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणी एक चौकशी समिती नेमली असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. तसेच गुरुवारी एका उच्चस्तरीय बैठकीचे देखील आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नवशक्तिशी बोलताना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in