नाशिक : कालसर्प पूजेच्या नावाखाली त्र्यंबकेश्वर येथे ऑनलाइन फसवणूक होत असल्याची तक्रार त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. या प्रकाराला भावनिक लूट असे संबोधत ट्रस्टने संबंधित ॲप्लिकेशनवर बंदी घालण्याची मागणी देखील केली आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे दररोज हजारो भाविक येत असतात. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने पूजाविधीसाठी भाविकांचा ओघ कायम आहे. कालसर्प पूजा हा एक महत्वपूर्ण धार्मिक विधी मानण्यात येतो. त्याचे सोपस्कार पार पाडण्यासाठी आवश्यक माहिती देताना काहीजण बाहेरील भाविकांची दिशाभूल करून लूट करीत असल्याचे प्रकार अलीकडे उघडकीस आले आहेत. विशेषतः पूजाविधी स्थळ, पुरोहित, दक्षिणा, विधीचा खर्च यांबाबत अनभिज्ञ असणारे बाहेरील भाविक ऑनलाइन सेवेच्या नावाखाली ॲप्लिकेशनची भुरळ घालणाऱ्यांच्या संपर्कात येतात. यामुळे फसवणूक होवून स्थानिक ब्रम्हवृन्दाचे नाव खराब होते. परप्रांतीयांना त्याचा मोठा फटका बसत असल्याच्या तक्रारी येत असल्यानेच देवस्थान ट्रस्टने हे पाऊल उचलले आहे.
आज ऑनलाइनच्या जमान्यात त्र्यंबकेश्वर आणि परप्रांतीय भाविक यांच्यातील अंतराचा काही ॲप्लिकेशन्स चालवणाऱ्यांनी गैरफायदा घेणे सुरु केले आहे, वस्तुतः, कालसर्प पूजाविधी त्र्यंबकेश्वर मंदिरात कधीही होत नाही. असे असताना बाहेरील भाविक ॲप्लिकेशन्सशी संबंधित व्यक्तींना पैसे देवून मोकळे होतात आणि प्रत्यक्ष इथे आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येते. म्हणूनच संबंधित ॲप्लिकेशन्सवर तत्काळ बंदी आणावी.
सुयोग वाडेकर, ज्येष्ठ पुरोहित तथा तालुकाध्यक्ष, भाजप, त्र्यंबकेश्वर
कालसर्प पूजाविधी केवळ पुरोहितांच्या घरी करण्यात येतो, त्र्यंबकेश्वर मंदिरात व अन्य कुठल्याही मदीरात, अश्रमात,मठान मध्ये होत नाही या वास्तवाची भाविकांना जाण करून न देता केवळ आर्थिक मोहापायी काही घटक त्यांची दिशाभूल करतात. यामुळे स्थानिक पुरोहितांच्या लौकिकाला धोका पोहोचतो. आम्ही याबाबत आधीही पोलिसांत तक्रार केली आहे. भाविकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. याबाबत कोणाला तक्रार असल्यास त्यांनी पोलिसांत तक्रार करावी.
मनोज थेटे, अध्यक्ष, पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर
‘या’ नावाचे ॲप्लिकेशन कार्यरत..
दरम्यान, परप्रांतीय भाविकांना चुकीचे मार्गदर्शन करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणारी अनेक ॲप्लिकेशन्स कार्यरत असल्याची माहिती यानिमित्ताने पुढे आली आहे. त्यामध्ये उत्सव, देवधाम, वामा, घरमंदिर, लाईफगुरु, अस्त्रोइंट्रा आदी डझनभर नावाने हिंदी भाषिक ॲप्लिकेशन्स भावनिक लूट करीत आहेत. त्यांच्यावर तत्काळ बंदी घालावी, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने पोलिसांतील तक्रारीत करण्यात आले आहे.