तुतारीची वाजणार पुंगी? आचारसंहितेमुळे व्यवसाय बुडण्याची वादकांना भीती

तुतारी हे वाद्य पारंपरिकदृष्ट्या लग्नसमारंभ आणि राजकीय सभा अशा दोन्ही ठिकाणी वाजवले जाते. यंदा लग्नसराई आणि निवडणुकीचा हंगाम एकाच वेळी येत आहे. मात्र, आचारसंहितेमुळे दोन्ही हंगाम हातचे जाण्याची आम्हांला भीती वाटत आहे.
तुतारीची वाजणार पुंगी?  आचारसंहितेमुळे व्यवसाय बुडण्याची वादकांना भीती

छत्रपती संभाजीनगर : रणभूमीपासून राजदरबारापर्यंत शतकानुशतके दुमदुमणारा तुतारीचा आवाज यंदा लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे दडपला जाण्याची भीती तुतारीवादकांना वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून शरद पवार गटाला निवडणुकीचे चिन्ह म्हणून तुतारी मिळाल्याने या वर्षीच्या निवडणूक आणि लग्नसराईच्या हंगामात तुतारीच्या वादनावर मर्यादा येतील आणि त्याचा व्यवसायावर परिणाम होईल, अशी धास्ती वर्तवली जात आहे. त्यामुळे यंदा तुतारीची पुंगी वाजण्याची शक्यता आहे.

पारंपरिक वाद्यांमध्ये तुतारीचा मान बराच वरचा आहे. युद्धभूमीवर सैनिकांना शत्रूवर तुटून पडण्याचे स्फुरण चढते ते तुतारीच्या ललकारीने! राजदरबारात विजयी वीरांच्या आगमनाची वर्दी दिले जाते तीही तुतारी फुंकूनच. मराठी मातीशी तर या तुतारीची नाळ अधिकच दृढ आहे. 'एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने’, असे म्हणत आपला क्रांतदर्शी हुंकार व्यक्त करण्यासाठी कवीवर्य केशवसुतांनी आधार घेतला तो याच तुतारीचा. मराठी चित्रपटसृष्टीच्या आगमनाची दुंदुभी आसमंतात निनादण्यासाठी 'प्रभात फिल्म कंपनी'ने वापर केला तोदेखील तुतारीचाच. लग्नसोहळा असो की कुस्त्यांचा फड, अथवा आपल्या अमोघ वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या वक्त्याची जाहीर सभा… पाहुण्यांच्या दमदार स्वागताचा मान जातो तो तुतारीकडेच! मांडवापुढे सगेसोयऱ्यांचे स्वागत करण्यासाठी सनई-चौघड्याच्या बरोबरीने रुबाबदार कोल्हापुरी फेट्यात सजलेला तुतारीवादक हे उन्हाळ्यात लग्नसराईतील ओळखीचे दृष्य. यंदाच्या लग्नसराईत मात्र हे चित्र तसेच पाहायला मिळेल की नाही, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि पक्षाच्या चिन्हाचा वाद न्यायालयात गेला. पक्षाचे जुने चिन्ह मनगटी घड्याळ वापरण्याचा अधिकार अजित पवार गटाला मिळाला, तर शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले. यंदाच्या उन्हाळ्यात लग्नसराईबरोबरच निवडणुकीचा हंगामही आला आहे. एप्रिल-मे महिन्यात सात वेगवेगळ्या टप्प्यांत देशभरात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. १६ मार्च रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि देशभरात आचारसंहिता लागू झाली. मतदारांच्या निर्णयावर परिणाम करेल अशी कोणतीही कृती करण्यावर मर्यादा आल्या. त्याचा फटका तुतारीलाही बसण्याची चिन्हे दिसत आहेत. वास्तविक लग्नसराई आणि निवडणुका हा हंगाम तुतारीवादकांच्या व्यववसायाला चालना देणारा असतो. याच वेळी त्यांना अनेक कार्यक्रमांत तुतारी वाजवण्यासाठी निमंत्रण मिळते आणि त्यातून चांगली बिदागीही पदरी पडते. पण या वर्षी आचारसंहितेमुळे तुतारी वाजवण्यार काही बंधने येऊ शकतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

लग्नाच्या कार्यक्रमात तुतारी वाजवली तर तो विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रचार मानला जाऊ शकतो. राजकीय सभेतही तुतारी वाजवण्याचा प्रघात आहे. पण, आता हे वाद्य राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे निवडणूक चिन्ह बनल्यामुळे अन्य राजकीय पक्ष त्यांच्या सभांमध्ये तुतारीवादकांना बोलावणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम तुतारीवादकांच्या व्यवसायावर होऊ शकतो. आचारसंहितेमुळे लग्नसराई आणि निवडणूक असा दुहेरी हंगाम हातचा जाण्याची धास्ती तुतारीवादकांना वाटत आहे. आचारसंहितेत तुतारी वाजवण्याच्या नियमांबाबत अद्याप संभ्रम आहे.

तुतारी हे वाद्य पारंपरिकदृष्ट्या लग्नसमारंभ आणि राजकीय सभा अशा दोन्ही ठिकाणी वाजवले जाते. यंदा लग्नसराई आणि निवडणुकीचा हंगाम एकाच वेळी येत आहे. मात्र, आचारसंहितेमुळे दोन्ही हंगाम हातचे जाण्याची आम्हांला भीती वाटत आहे.

- जयसिंग होळीये, तुतारीवादक पुरवठादार, छत्रपती संभाजीनगर

राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह असलेल्या अनेक वस्तू आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो. त्यांचा वापर टाळता येणार नाही. पण यंदा आचारसंहितेमुळे लग्न आणि राजकीय कार्यक्रमात तुतारी वाजवता येणार की नाही याबद्दल संभ्रम आहे. लग्नात दोन्ही पक्षांकडून परवानगी मिळाली तर आम्ही तुतारी वाजवू, अन्यथा वाजवणार नाही.

- बाबुराव गुरव, तुतारीवादक, छत्रपती संभाजीनगर

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in