सत्य लोकांसमोर येणे महत्त्वाचे; विमान अपघाताबाबत ९ तारखेनंतर जनतेसमोर येणार - रोहित पवार

गेल्या २८ तारखेपासून पवार परिवारात कसलीही राजकीय चर्चा झालेली नाही आणि आम्हालाही एखादी राजकीय भूमिका घेणे, या दुःखद काळामध्ये भावनिक दृष्टीने थोडेसे अवघड जात आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : गेल्या २८ तारखेपासून पवार परिवारात कसलीही राजकीय चर्चा झालेली नाही आणि आम्हालाही एखादी राजकीय भूमिका घेणे, या दुःखद काळामध्ये भावनिक दृष्टीने थोडेसे अवघड जात आहे. अजित पवारांच्या तेराव्यानंतर म्हणजेच नऊ तारीख होऊन जाऊ द्या, मग स्पष्टपणे यासंदर्भात बोलता येईल, असे सांगत दोन्ही राष्ट्रवादीची युती होईल किंवा विलीनीकरण होईल, अथवा नाही होईल, यावर मी भाष्य करण्याइतका मोठा नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी सांगितले.

राज्याचे उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत त्यांचे स्मारक उभारण्यासाठीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. गुरुवारीही पवार कुटुंबाची एकत्र बैठक पार पडली. प्रतिभा पवार, शरद पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार, रणजित पवार तसेच विद्या प्रतिष्ठानचे काही विश्वस्तदेखील यावेळी उपस्थित आहेत. रोहित पवार यांनी गुरुवारी पार्थ पवार, जय पवार आणि पवार कुटुंबियातील इतर सदस्यांसोबत बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवारांच्या स्मारकासाठी जागेची पाहणी केली. या पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, “अजितदादांवर ज्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार झाले, तिथेच त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पवार कुटुंबाने घेतला आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर पार्थ आणि मी प्रत्यक्ष स्मारकाच्या जागेबाबत चर्चा केली. तसेच अजितदादांचे ३५ ते ४० वर्षांचे राजकीय कार्य लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या स्मृतींचे जतन व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.”

रोहित पवार म्हणाले, “शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या, त्या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत, युती होईल किंवा विलीनीकरण होईल, नं होईल, यावर भाष्य करण्याइतपत मी मोठा नाही. फक्त जे काही राजकीय दृष्टिकोनातून काही आरोप प्रत्यारोप चर्चा, जे काही महाराष्ट्रात सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी दुःख वाटत आहे. चर्चा योग्य दिशेने न होता, ती भरकटत चालली असून त्याला राजकीय स्वरूप दिले जात असल्याचे पाहून परिवारातील एक व्यक्ती म्हणून दुःख होत आहे.”

दुरावा नाहीसा झाला - रोहित पवार

राजकीय मतभेदांमुळे गेल्या काही काळात पवार कुटुंबामध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला होता, मात्र या संकटकाळात संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा खंबीरपणे एकत्र आले आहे. शरद पवार हे नेहमीच कुटुंबाचा केंद्रबिंदू राहिले असून, या कठीण प्रसंगात ते सर्वांना मार्गदर्शन करत आहेत. अजितदादांच्या अनुपस्थितीतही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्थ, जय आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्य एकजुटीने काम करत असून, हा कौटुंबिक स्नेह भविष्यातही कायम राहील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in