फोडाफाेडीच्या पुन्हा वावड्या! विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना भाजपमध्ये खेचण्याचा प्रयत्न

फोडाफाेडीच्या पुन्हा वावड्या! विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना भाजपमध्ये खेचण्याचा प्रयत्न

सध्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमच्या संपर्कात नाहीत.

विशेष प्रतिनिधी/मुंबई : विरोधी पक्षाला अधिकाधिक कमकुवत करण्याचा भाजपचा धडाका अजूनही सुरूच असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील बड्या नेत्यांना भाजपमध्ये खेचण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटामध्ये अजूनही बरेच नेते आपले प्रभावक्षेत्र राखून आहेत. त्यांना सातत्याने चुचकारण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच बड्या नेत्यांना थेट ऑफरही दिल्या जात आहेत आणि निवडणुकीच्या आधी वावड्या उठवून विरोधी पक्षाचे बळ कमी करण्याचा प्रयत्नही भाजप नेते करत आहेत. त्यातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तसेच एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत सामील होणार असल्याचा खळबळजनक दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी दिल्लीत केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आता तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील बडे नेते भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या वावड्या सुरू आहेत. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपने पक्षात घेऊन थेट राज्यसभेत पाठविले. त्यामुळे अशोकराव चव्हाण यांचे पुनर्वसन झाले. त्याच पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील इतर बड्या नेत्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सातत्याने चाचपणी सुरू असून, लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत आणखी काही बड्या नेत्यांना ऑफर देण्याचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे सातत्याने रोज नव्या वावड्या उठू शकतात. आता तर काँग्रेसमधील विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांनी निष्कारण चर्चा घडवून आणल्या जात आहेत. आम्ही आहे तिथेच बरे आहोत, असे म्हटले आहे. जयंत पाटील यांनी सोमवारी स्वत: पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जयंत पाटील आणि त्यांचे सुपुत्र लवकरच भाजपमध्ये दाखल होतील, असे सांगितले जात असून, यावरून राजकीय गोटात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल एक विधान केले असून, ‘तुमचे आणि आमचे एकच बॉस असतील’, असे सूचक विधान केले आहे.

दरम्यान, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता त्यांनी मोदींचे नेतृत्व स्वीकारून जर कुणी भाजपमध्ये येत असेल, तर त्यांचे आम्ही स्वागत करू. परंतु जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आपल्या संपर्कात नाहीत. त्यामुळे आपण त्याविषयी काहीही बोलणार नाही, असे म्हणून विषयाला पूर्णविराम दिला.

उद्या काय होईल सांगता येत नाही -बावनकुळे

सध्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमच्या संपर्कात नाहीत. मात्र, उद्या काय होईल सांगता येत नाही. कारण लोकांचे विचार रोज बदलत असतात. मोदींच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी आमच्याकडे येत असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करायला तयार आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

भाजपमध्ये येण्यासाठी मातोश्रीवर मंथन सुरू -राणा

शिवसेना फुटल्यापासून उद्धव ठाकरे बैचेन आहेत. त्यांना कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दर्शन घेतो आणि माफी मागतो, असे झाले आहे. उद्धव ठाकरे काही लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. ते लवकरच काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ सोडतील. याबाबत मातोश्रीवर मंथन सुरू असल्याचा दावाही रवी राणा यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in