

पुणे : ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’, अशा गगनभेदी जयघोषात, टाळ-मृदंगाच्या मंगलमय तालावर आणि डोळ्यांत सावळ्या विठुरायाच्या भेटीची आर्त ओढ घेऊन, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे मंगळवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. मंगळवार सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे वारकरी देहूत दाखल झाले होते.
यंदा इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली होती. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देऊळवाड्यात (मुख्य मंदिरात) मोठी गर्दी होऊ नये म्हणून मोजक्याच मानकरी, सेवाकरी आणि वारकऱ्यांच्या मर्यादित उपस्थितीत अतिशय शिस्तबद्ध व सुरक्षितपणे हा प्रस्थान सोहळा पार पडला.
मंत्रघोषात झाले पादुकापूजन
नियोजित कार्यक्रमानुसार, दुपारी अडीचच्या सुमारास इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आलेल्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली.