तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली ; राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

दोनच महिन्यांपूर्वी मुंढे यांची आरोग्य विभागातील सेवा आयुक्तालयात आयुक्त म्हणून नेमणूक केली होती, मात्र आता तेथून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली ; राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सततच्या बदलीमुळे कायम चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. दोनच महिन्यांपूर्वी मुंढे यांची आरोग्य विभागातील सेवा आयुक्तालयात आयुक्त म्हणून नेमणूक केली होती, मात्र आता तेथून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मुंढे यांची बदली करण्यात आली असली, तरी त्यांना नवीन नियुक्ती देण्यात आली नसल्याने काही काळ प्रतीक्षेत राहावे लागणार आहे. मुंढे यांच्यासोबत इतरही काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिर्डी श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.

राज्य सरकारने मंगळवारी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप हे बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी डॉ. सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांची परभणी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सुनील चव्हाण यांची कृषी आयुक्त, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. एस. एम. कुर्तकोटी यांची भंडारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडमधील देगलूर उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे आणि वाद हे सातत्याने सोबतच चालत असतात. दोनच महिन्यांपूर्वी मुंढे यांची आरोग्य विभागाच्या सेवा संचालनालयाच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती. या विभागाचा कारभार स्वीकारताच त्यांनी नेहमीच्या धडाक्यात काम सुरू केले होते. मुंढे यांनी राज्यातील विविध रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णांशी संवाद साधत त्यांना दिल्या जात असलेल्या सेवा-सुविधांबाबत माहिती घेतली होती. तसेच डॉक्टरांना मुख्यालयी थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. कर्मचाऱ्यांना वेळेत येण्या-जाण्यास मुंढे यांनी आदेश दिले होते. तुकाराम मुंढे यांची गेल्या १७ वर्षांत तब्बल १९ वेळा बदली झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in