‘तुळजाई’ बोटीचे अवशेष सासवणे किनाऱ्यावर

उरण तालुक्यातील करंजा बंदरातून निघालेली ‘तुळजाई’ ही मच्छीमार बोट शनिवारी सकाळी समुद्रात बुडाल्यानंतर दोन दिवसांनी तिचे अवशेष सासवणे किनाऱ्यावर सापडले. या भीषण दुर्घटनेने बेकायदेशीर मासेमारी, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि मासेमारांचा जीव धोक्यात घालणारी उदासीन यंत्रणा यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘तुळजाई’ बोटीचे अवशेष सासवणे किनाऱ्यावर
Published on

धनंजय कवठेकर/रायगड

उरण तालुक्यातील करंजा बंदरातून निघालेली ‘तुळजाई’ ही मच्छीमार बोट शनिवारी सकाळी समुद्रात बुडाल्यानंतर दोन दिवसांनी तिचे अवशेष सासवणे किनाऱ्यावर सापडले. या भीषण दुर्घटनेने बेकायदेशीर मासेमारी, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि मासेमारांचा जीव धोक्यात घालणारी उदासीन यंत्रणा यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ही घटना शनिवारी घडली. खांदेरी किल्ल्याजवळ भरतीच्या प्रचंड लाटांमुळे ‘तुळजाई’बोट दोन भागांत तुटून समुद्रात बुडाली. बोटीवर आठ खलाशी होते. यातील पाच जण डेकवर होते, त्यांनी समुद्रात उड्या घेऊन लाटांशी झुंज देत किनाऱ्यावर पोहोचण्यास यश मिळवले. मात्र, केबिनमध्ये अडकलेले तिघे नरेश शेलार, धीरज कोळी आणि मुकेश पाटील समुद्रात गडप झाले. त्यांचे मृतदेह शोधपथकाच्या मदतीने नंतर सापडले.

दुर्घटनेनंतर ‘तुळजाई’ बोटीचा एक तुकडा सासवणे किनाऱ्यावर वाहून आला. त्याच्या अवस्थेवरून बोट व त्यावरील खलाश्यांनी कोणत्या परिस्थितीला सामोरे गेले असेल याची कल्पना करता येते. बोटीचे तुकडे खडकांवर अडकले असून स्थानिक मच्छिमारांमध्ये या घटनेने हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता प्रशासनावर दबाव वाढत आहे. स्थानिक मच्छीमार संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, बंदी काळातील बेकायदेशीर मासेमारी थांबवा अन्यथा अशा दुर्घटना पुन्हा घडतील. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मासेमारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता केली जात आहे.

बेकायदेशीर मासेमारीचा गंभीर प्रश्न

मासेमारी बंदीचा कालावधी अद्याप सुरू असतानाही ‘तुळजाई’ बोट समुद्रात कशी गेली, यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याकाळात मासे प्रजनन अवस्थेत असतात, समुद्र खवळलेला असतो, हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला असतो. तरीदेखील बोट समुद्रात कशी गेली? कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली? कोण दुर्लक्ष करतंय? कोण यामागे लाभ घेतंय? हे येत्या काळात पहावयास मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in