तुळशी तलाव 'ओव्हर फ्लो' मुंबईकरांना किंचित दिलासा

तोपर्यंत १० टक्के पाणी कपात सुरुच राहणार, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दैनिक 'नवशक्ति'शी बोलताना दिली.
तुळशी तलाव 'ओव्हर फ्लो' मुंबईकरांना किंचित दिलासा
Published on

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात वरुणराजाची दमदार इनिंग सुरु आहे. धरण क्षेत्रात बरसणाऱ्या पावसामुळे सात धरणांपैकी तुळशी तलाव गुरुवारी रात्री १.२५ मिनिटांनी 'ओव्हर फ्लो' झाला. २० जुलैपर्यंत सात ही धरणात ३९.६१ टक्के म्हणजेच ५ लाख ७३ हजार ३४० दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. दरम्यान, धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ होत नाही तोपर्यंत १० टक्के पाणी कपात सुरुच राहणार, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दैनिक 'नवशक्ति'शी बोलताना दिली.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सात धरणात १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र यंदा पावसाने धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने धरणातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला होता. ७ टक्केच पाणी सात ही धरणात उपलब्ध असल्याने १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरु असून पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. धरणात बरसणाऱ्या पावसामुळे सात धरणांपैकी तुळशी तलाव गुरुवारी रात्री १.२५ मिनिटांनी ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सात ही धरणातील पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ होत नाही तोपर्यंत पाणी कपात सुरुच राहणार असल्याचे वेलरासू यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in