तुषार गांधी, प्रकाश आंबेडकर यांच्यात कलगीतुरा; डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे पणतू एकमेकांच्या विरोधात

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार देऊन केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपची मदतच केली आहे.
तुषार गांधी, प्रकाश आंबेडकर यांच्यात कलगीतुरा; डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे पणतू एकमेकांच्या विरोधात
Published on

पुणे(प्रतिनिधि)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार देऊन केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपची मदतच केली आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित आणि एमआयएम काम करत आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम आहे, असा आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे. वंचित आणि एमआयएमच्या विरोधात अधिकाधिक प्रचार करून त्यांना मतदान न करण्याचे आवाहन मतदारांना केले जाणार असल्याचे तुषार गांधी यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे पणतू एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीत सहभागी होऊन वंचितने निवडणूक लढवावी, असा आग्रह महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होता. यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी वारंवार चर्चादेखील केली जात होती. मात्र, जागावाटप योग्य पद्धतीने होत नसल्याचे कारण पुढे करत आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडणे पसंत केले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर करत काही ठिकाणी त्यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणादेखील केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढविणे गरजेचे होते. मात्र, वंचितने स्वतंत्र उमेदवार देत चूक केली आहे. वंचित विकास ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याने महाविकास आघाडीत सहभागी न होण्याचा निर्णय वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला असल्याचा आरोप गांधी यांनी केला. वंचित भाजपला मदत करत असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत वंचितला मतदान करू नका. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान न करण्याचे जाहीर आवाहन गांधी यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राची स्थापना

महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन करण्यासाठी तुषार गांधी यांनी प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राची स्थापना केली आहे. या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीत ⁠महाविकास आघाडीला मतदान करा, महायुतीला मतदान करू नका, असे आवाहन केले जात असल्याचे तुषार गांधी यांनी सांगितले. अनेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक तसेच चित्रपट कलावंत यांचा प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्रच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे गांधी म्हणाले. राज्यातील विविध मतदारसंघांत फिरून महायुतीला मतदान न करण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

’तुषार गांधी यांचे वक्तव्य सर्वसमावेशकता नाकारणारे‘

पुणे(प्रतिनिधी) : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलेल्या विधानाचा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला असून, त्यांना खरी बाजू लक्षात आणून दिली आहे. आंबेडकरांनी ही माहिती त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केली आहे. त्यात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच; पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे. तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार देऊन केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपची मदतच केली आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित आणि एमआयएम काम करत आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम आहे, असा आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केला आहे.

त्यावर आंबेडकर यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का?महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? असे प्रश्न तुषार गांधी यांना विचारले आहेत.

तसेच आंबेडकर यांनी म्हटले की, जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. खरं तर, आताच सगळे संकेत दिसत आहेत. पण, तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in