दोन लाखांच्या लाचप्रकरणी तहसीलदारासह दोघे अटकेत

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जप्त केलेली वाळूची २ वाहने सोडविण्यासाठी २ लाखांची लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीसोबतच पैठणच्या तहसीलदाराला अटक करण्यात आली.
दोन लाखांच्या लाचप्रकरणी तहसीलदारासह दोघे अटकेत
प्रातिनिधिक फोटो
Published on

छत्रपती संभाजीनगर : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जप्त केलेली वाळूची २ वाहने सोडविण्यासाठी २ लाखांची लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीसोबतच पैठणच्या तहसीलदाराला अटक करण्यात आली. तिसरा आरोपी महसूल सहाय्यक मात्र पसार झाला. धक्कादायक म्हणजे, यातील ४० हजार रुपये थेट 'फोन पे'वर घेतले आहेत. अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १८ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान ही कारवाई केली. अटकेतील दोन्ही आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तहसीलदाराच्या घरझडतीत ३२ ग्रॅम सोने आणि १२ हजार रोकड मिळून आली.

तहसीलदार सारंग भिकुसिंग चव्हाण, महसूल सहाय्यक हरिष शिंदे आणि खासगी व्यक्ती सलील करीम शेख (३८)अशी आरोपींची नावे आहेत. अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा गौण खणिज अधिकारी किशोर घोडके यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी हिरडपुरी येथे कारवाई करून काही वाहने जप्त केली होती. ही वाहने तहसील कार्यालयात उभी होती. यात तक्रारदार स्वप्निल सुरेश तांबे (३२) यांची दोन वाहने होती. ही वाहने सोडविण्यासाठी खासगी व्यक्ती सलील शेख याने तांबे यांच्याकडे २ लाख रुपये लाचेची मागणी केली. तसेच, पैसे दिल्याशिवाय वाहन सोडण्यास तहसीलदारांनी नकार दिला.

तिसरा आरोपी महसूल सहाय्यक हरीष शिंदे हा आहे. त्याच्याकडे दंडाच्या रकमेचे चलन काढून देण्याचे काम होते. तेवढ्या कामासाठी त्याने ५० हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार तांबे यांनी त्याला २० हजार रुपये दिल्यापासून तो पसार झाला आहे. आरोपी सलील शेख हा खासगी व्यक्ती आहे.

logo
marathi.freepressjournal.in