भारतात इन्फ्लुएंझा व्हायरस एच३ एन२ या विषाणूचे रुग्ण वाढत असताना शुक्रवारी या विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांत प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील ८२ वर्षीय हासन यांचा इन्फ्लुएंझा विषाणूमुळे मृत्यू झाला. या विषाणूमुळे मृत्यू पावणारी देशातील ही पहिली व्यक्ती आहे. त्याशिवाय हरियाणा येथेही एका व्यक्तीचा इन्फ्लुएंझामुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हासन यांना २४ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना डायबेटिस आणि हाय ब्लडप्रेशरचा आजार होता. देशभरात एच३ एन२ या विषाणूचे ९० रुग्ण आढळले आहेत. एच१एन१ या विषाणूचेही आठ रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यात देशभरात तापाच्या साथीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये बहुतांश रुग्ण एच३ एन२ या विषाणूने संक्रमित असल्याचे समोर आले. या विषाणूला ‘हाँगकाँग फ्लू’ या नावानेही ओळखले जाते. हा विषाणू भारतात इतर इन्फ्लुएंझा सब व्हेरियंटच्या तुलनेत अधिक शक्तिशाली आहे.
कोरोनासारखी लक्षणे
भारतात आतापर्यंत फक्त एच३ एन२ आणि एच१ एन१ संक्रमित रुग्ण मिळाले होते. या दोन्ही विषाणूंची लक्षणे कोरोना व्हायरससारखी आहेत. या विषाणूने जगभरात अनेकांना बाधित केले आहे. कोरोना महामारीला दोन वर्षे झाल्यानंतर पुन्हा एकदा फ्लूच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे.