नागपूरमध्ये स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी
नागपूर : नागपूरमधील कळमेश्वर तालुक्यातील बीत्तलवाडी परिसरात असलेल्या एका स्फोटकांच्या कारखान्यात रविवारी दुपारी झालेल्या स्फोटात दोन कामगार ठार झाले असून तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
भुरा लक्ष्मण रजत (२५), मुनीम मडावी (२९) अशी मृतांची तर सौरभ लक्ष्मण मुसळे (२५), घनश्याम लोखंडे (३५) आणि शिफान शेख (२५) अशी गंभीर जखमी कामगारांची नावे आहेत. स्फोटाचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जखमी कामगारांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि गावकऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराकडे मोठी गर्दी केली होती.
‘एशियन फायर वर्क्स’ कंपनीत स्फोटामुळे लागलेल्या आगीत सर्व सामान खाक झाले. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. रुग्णवाहिकांद्वारे गंभीर जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
या कंपनीत एकूण ५० कामगार काम करतात. एका युनिटमध्ये सात कामगार कार्यरत होते. मात्र, लंचटाइम असल्याने दोघे जेवण करण्यासाठी घरी गेले होते, तर एक जण बाहेर गेला होता. युनिटजवळ पाच कामगार असताना स्फोट झाला आणि त्यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले.