पुण्यात दोन अल्पवयीन मुलींची अत्याचार करून हत्या; आरोपीला अटक

पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे मोलमजुरीसाठी आलेल्या भटक्या-विमुक्त समाजाच्या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची पाण्याच्या पिंपात बुडवून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
पुण्यात दोन अल्पवयीन मुलींची अत्याचार करून हत्या; आरोपीला अटक
Published on

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे मोलमजुरीसाठी आलेल्या भटक्या-विमुक्त समाजाच्या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची पाण्याच्या पिंपात बुडवून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने राजगुरूनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.

आरोपी नराधमास खेड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पीडित मुलींच्या नातेवाईक व समाजातील नागरिकांनी खेड पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करीत आरोपीस फाशी देऊन शासनाने आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

राजगु‌रूनगर येथे वास्तव्यास असलेल्या भटक्या गोसावी समाजातील आठ व नऊ वर्षे वयाच्या दोन मुली घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत संबंधित पालकांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी पीडित कुटुंब वास्तव्यास असलेल्या ठिकाणी शोधाशोध सुरू केली असता या दोन्ही मुली जवळच असणाऱ्या इमारतीच्या बाजूला पाण्याच्या पिंपात मृतावस्थेत आढळल्या.

राजगुरूनगर शहराला काळीमा फासणाऱ्या या घटनेने विविध संघटना पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुढे सरसावल्या असून आरोपीस जलदगतीने खटला चालवून तत्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

ही घटना निर्दयी, निर्घृण असून माणुसकीला न शोभणारी आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या तालुक्यात अशा घटना घडू नयेत म्हणून गुन्हेगाराला चपराक मिळायला पाहिजे. जलदगती न्यायालयात खटला चालून आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मताशी मी सहमत आहे, असे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले.

परप्रांतीय वेटरचे कृत्य

पोलिसांनी अधिक तपास केला असता या मुलींपैकी एकीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळले. त्यानंतर जवळच बिअर बारमध्ये काम करत असलेल्या परप्रांतीय वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले.

logo
marathi.freepressjournal.in