शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटणार; संदीपान भुमरे यांचा दावा

शिवसेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे गटात सामील होतील.
शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटणार;  संदीपान भुमरे यांचा दावा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला चांगलीच गळती लागली असून सेनेतील नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले. सातत्याने पडझड सुरू असतानाच शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे.

पैठण येथील कार्यक्रमात संदीपान भुमरे यांनी हा दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले ते दोन आमदार कोण, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदे गटात सामील होतील. त्यातील एकाने आमची भेट घेतली असून, दुसराही आमच्या संपर्कात असल्याचा दावा यावेळी भुमरे यांनी केला.

पैठण मतदारसंघात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला लोकांची प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच संदीपान भुमरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे; मात्र मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुमरे यांनी घेतलेल्या कार्यक्रमाला प्रतिसाद न मिळाल्याने ते संतापले होते. यावरून कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या दाखवत शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भुमरे यांना टोला लगावला आहे. “सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी ‘देशभ्रमंती’ करून राज्याचे रोजगारमंत्री संदीपान भुमरे पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रकटले. त्यांच्या स्वागताला पैठणमधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांचीदेखील उपस्थिती होती,” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in