

तेजस वाघमारे /मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात दोन राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आमने-सामने आले आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या अजित पवार गटाच्या तिकिटावर लढत आहेत. तर फहाद अहमद हे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शिंदे गटाचे अविनाश राणे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याने दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे दिसते.
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात सुमारे ९२ हजार हिंदू, ७८ हजार मुस्लिम, २७ ते २८ हजार दलित आणि ३८ हजार ख्रिश्चन मतदार आहेत. रोखठोक वक्तव्ये करण्यात प्रसिद्ध असलेले नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत मलिक यांना ३८ हजार ९२८ मते मिळाली होती. तर शिवसेनेचे तुकाराम काते यांना ३२ हजार १०३ मते मिळाली होती. मनसेचे नवीन आचार्य यांना १६ हजार ७३७ मते मिळाली होती. आरपीआय आठवले गटाचे गौतम सोनवणे यांना ७ हजार २७४ मते मिळाली होती. या निवडणुकीत मलिक यांनी ६ हजार ८२५ मताधिक्याने विजय मिळवला होता.
२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे तुकाराम काते यांनी नवाब मलिक यांचा पराभव केला होता. केवळ १ हजार ७ मतांनी काते विजयी झाले होते. काते यांना ३९ हजार ९६६ मते मिळाली होती. तर नवाब मलिक यांना ३८ हजार ९५९ मते मिळाली होती. भाजपचे विठ्ठल खरटमोल यांना २३ हजार ७६७ आणि मनसेच्या विना उकरंडे यांना ३ हजार २८५ मते मिळाली होती.
२०१९ च्या निवडणुकीत नवाब मलिक यांनी १२ हजार ७५१ मताधिक्याने विजय मिळवला. मलिक यांना ६५ हजार २१७ मते मिळाली, तर तुकाराम काते यांना ५२ हजार ४६६ मते मिळाली. मनसेचे ॲड. विजय रावराणे यांना ५ हजार ८७९ मते मिळाली होती. तसेच अपक्ष उमेदवार यासिन सय्यद यांना ७ हजार ७०१ मते मिळाली होती.
या मतदारसंघातून यंदा ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये मनसेचे नवीन आचार्य, बहुजन समाज पक्षाचे ॲड. महेंद्र भिंगारदिवे, वंचित बहुजन आघाडीकडून सतीश राजगुरू निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिंदे गटाने या जागेवर उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
पुरुष - १ लाख ४३ हजार ८४४
महिला - १ लाख २५ हजार १९४
ट्रान्सजेंडर - ३१
एकूण - २ लाख ६९ हजार ६९
मतदारसंघातील समस्या
अस्वच्छता
वाहतूककोंडी
झोपड्पट्टीचा पुनर्विकास