छत्तीसगडमध्ये चकमकीत १० कोटींचे बक्षीस असलेले दोन नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुजमाडच्या जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या दोन केंद्रीय समिती सदस्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या दोघांवर विविध राज्यांत एकूण दहा कोटींचे बक्षीस होते. कादरी सत्यनारायण उर्फ कोसा (६७), कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ विकल्प उर्फ राजू दादा (६१) असे ठार झालेल्या नक्षलींची नावे आहेत.
छत्तीसगडमध्ये चकमकीत १० कोटींचे बक्षीस असलेले दोन नक्षलवादी ठार
Published on

गडचिरोली : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुजमाडच्या जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या दोन केंद्रीय समिती सदस्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या दोघांवर विविध राज्यांत एकूण दहा कोटींचे बक्षीस होते. कादरी सत्यनारायण उर्फ कोसा (६७), कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ विकल्प उर्फ राजू दादा (६१) असे ठार झालेल्या नक्षलींची नावे आहेत.

गेल्या महिनाभरात नक्षलवाद्यांचे चार केंद्रीय समिती सदस्य ठार झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नारायणपूर - गडचिरोलीलगतच्या अबुजमाडच्या सीमावर्ती परिसरात शोधमोहीम राबवली होती. यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यास जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंकडून बराच काळ धुमश्चक्री सुरू होती. अखेरीस सुरक्षा दलांनी या चकमकीत नक्षलवाद्यांच्या कोसा व विकल्प या दोन प्रमुख नेत्यांना टिपण्यात यश मिळवले. कोसा हा नक्षल चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा नेता होता. केंद्रीय समितीत त्याचा मोठा प्रभाव होता. तर विकल्प हादेखील नक्षलींचा प्रमुख नेता होता. नक्षल चळवळीत प्रवक्तेपदासह अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्याच्याकडे होत्या.

सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून दोघांच्या मृतदेहासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, स्फोटके व नक्षली प्रचार साहित्य जप्त केले. यामध्ये एके-४७ सारखी अत्याधुनिक बंदुकीचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून कोसा आणि विकल्प हे साथीदारांसह या परिसरात लपून बसले होते. दहा दिवसांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत ते थोडक्यात बचावले होते. चकमकीत ठार झालेला कादरी सत्यनारायण उर्फ कोसा हा तेलंगणातील थाडूर सिरसिला जिल्ह्यातील रहिवासी आहे.

logo
marathi.freepressjournal.in