
उपनगरीय गाड्यांच्या देखभालीसाठी दोन कारशेड उभारली जाणार आहेत. प. रेल्वेचे वाणगाव, तर मध्य रेल्वेचे भिवपुरी येथे कारशेड उभारले जाईल. या प्रकल्पासाठी २३५२.७७ कोटी रुपये खर्च असून, डिसेंबर २०२५ मध्ये ते काम पूर्ण होईल. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.
मुंबई उपनगरीय नेटवर्कसाठी सहा कारशेड आहेत. मध्य रेल्वेचे कुर्ला, सानपाडा व कळवा येथे कारशेड आहे, तर प. रेल्वेचे मुंबई सेंट्रल, कांदिवली व विरारला आहे. रोज या कारशेडमध्ये २५० लोकल ट्रेन निरीक्षण व देखभालीसाठी जातात.
या नवीन कारशेड प्रकल्पाबाबत अधिकारी म्हणाले की, भिवपुरी कारशेडचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. यासाठी ५४.५६ हेक्टर खासगी जागा, तर ३.१६ हेक्टर सरकारी जागा लागेल. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे. राजपत्रात अधिसूचना प्रकाशित झाली आहे. सरकारी जागेसाठी ५.८५ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. त्यापैकी ३ कोटी रुपये आगाऊ भरले आहेत.
वाणगाव कारशेडचा प्रकल्प सर्व्हे पूर्ण झाला आहे. भूसंपादनासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे. विशेष रेल्वे प्रकल्प, सक्षम प्राधिकरण व भूसंपादन अधिकाऱ्याने राजपत्रात अधिसूचना जारी केली आहे. नवीन कारशेड हे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेल. लोकलच्या निरीक्षणासाठी तेथे सेन्सर्स लावले जातील. ६५ ट्रेनची देखभाल करता येईल, अशी व्यवस्था केली जाईल.