भिवंडीत निवडणूकीला गालबोट! अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांवर मुरबाडमध्ये प्राणघातक हल्ला

दुपारच्या सुमारास भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांच्या दोन कार्यकर्त्यांवर मुरबाड मध्ये प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
निलेश सांबेरंच्या कार्यकर्त्यांवर हल्ला
निलेश सांबेरंच्या कार्यकर्त्यांवर हल्लाfpj

विशेष प्रतिनिधी

मुरबाड: लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मुरबाडमध्ये शांततेत मतदान होत असतानाच दुपारच्या सुमारास भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांच्या दोन कार्यकर्त्यांवर मुरबाडमध्ये प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला-

मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दौलत बांगर आणि जयवंत बांगर हे जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष आणि भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचे काम करतात. या रागातून त्यांच्यावर आज दुपारच्या सुमारास भुवनपाडा रस्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोघांना जबर मारहाण करण्यात आली असून त्यांच्या चारचाकी वाहनांची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे. जखमींना मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी उल्हासनगर येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे

भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची चर्चा-

हा हल्ला व मारहाण भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे बोलले जात असून मुरबाडमध्ये वातावरण तंग बनले असून मतदान व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे. शांततेत चाललेल्या निवडणुकीत गालबोट लावण्यात आल्याने पोलिसांनी रात्रंदिवस केलेल्या मेहनती वर पाणी फेरले आहे. या घटनेनंतर गुंडगिरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे

logo
marathi.freepressjournal.in