पुणे-सोलापूर महामार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू; ४० ते ५० प्रवासी जखमी
वरवंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस आणि वरवंडच्या सीमेवर असलेल्या निसर्ग हॉटेलजवळ दोन एसटी बसेसची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक महिला व एक ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन्ही बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी झाले आहेत.
सुवर्णा संतोष होले (वय ३८) व नामदेव आढाव (७०) या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पाटस पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या वरवंड गावाजवळील कौठीचा मळा येथे घडला.
४५ प्रवासी जखमी
सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बससमोर एक मोटारसायकल आडवी आल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न बसचालकाने केला. त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही बस दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली. या अपघातात दोन्ही बसेसमधील साधारण ४० ते ५० प्रवासी जखमी झाले आहेत. या दोन्ही बसमधील चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत.
बसमधील अडकलेल्या प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे यवत ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.