
नागपूर : नागपुरात अद्यापही ‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस’च्या (एचएमपीव्ही) रुग्णाची नोंद झाली नाही. जे दोन रुग्ण आढळून आले ते संशयित आहेत. त्यांचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) व पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल आल्यावरच आजाराची पुष्टी केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.
‘एचएमपीव्ही’चे दोन रुग्ण आढळून आल्याच्या वृत्ताने उपराजधानीत खळबळ उडाली आहे. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी ते संशयित रुग्ण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, संशयित रुग्णांमध्ये १४ वर्षांची मुलगी व ७ वर्षांचा मुलगा आहे. त्यांना सर्दी, खोकला व ताप असल्याने एका खासगी रुग्णालयातच त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ‘एचएमपीव्ही’ पॉझिटीव्ह आले. मात्र, शासकीय प्रयोगशाळेतून त्याची पुष्टी होणे गरजेचे आहे. म्हणून ‘एम्स’ व पुण्याच्या प्रयोगशाळेत हे नमुने पाठविण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
रुग्णांचे ‘जिनोम सिक्वेसिंग’ करणार
या रुग्णांचे ‘जिनोम सिक्वेंसिंग’ केले जाईल, तसेच ‘सिटी व्हॅल्यू २५’च्या खाली आल्यास आवश्यक उपाययोजना केल्या जातील. दोन दिवसांत तपासणीचा अहवाल येण्याची शक्यता आहे. या विषाणूबाबत आरोग्य सेवा महासंचालनालय आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांनी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. हा विषाणू आपल्यासाठी नवीन नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी घेणे आवश्यक आहे, शासकीय रुग्णालयांना अलर्ट करण्यात आले आहे. गरज पडल्यास स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.