गुजरातचे दोन ठग महाराष्ट्र लुटताहेत; उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदी, शहांवर सडकून टीका

राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहेत. गुजरातचे दोन ठग महाराष्ट्राच्या सुखात मिठाचा खडा टाकत आहेत. भ्रष्ट महायुतीच्या मदतीने महाराष्ट्र लुटतायत, अशी सडकून टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली.
वज्र निर्धार परिषदेत भाषण करताना उद्धव ठाकरे
वज्र निर्धार परिषदेत भाषण करताना उद्धव ठाकरे
Published on

मुंबई : भाजपचे हिंदुत्व हे घर पेटवणारे, तर आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे आहे. मात्र महाराष्ट्राचा विकास काही जणांना बघवत नाही. त्यामुळे राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहेत. गुजरातचे दोन ठग महाराष्ट्राच्या सुखात मिठाचा खडा टाकत आहेत. भ्रष्ट महायुतीच्या मदतीने महाराष्ट्र लुटतायत, अशी सडकून टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली.

‘बेटी पढाओ, बेटी बचाव’ या म्हणीला हरताळ फासला जात असून मुलगी शिकली, प्रगती झाली आणि १५०० रुपये देऊन घरी बसवली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी महायुतीला लगावला. मंगळवारी राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत ते बोलत होते. ‘महाभ्रष्ट महायुतीला सरकारला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर, शिवरायांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्र घडवायचा आहे’, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, ‘आवाज कुणाचा शिवसेनेचा, उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’च्या घोषणांनी शिवसैनिकांनी यावेळी शिवाजी मंदिर दणाणून सोडले.

‘शहा’कारी माणसाच्या गळ्यात हड्डी अडकली!

महाराष्ट्राचा विकास होतोय हे काहींना बघवत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात नाक खुपसत असतात. महाराष्ट्राच्या विकासामुळे जुमलेबाज सरकारमधील ‘शहा’कारी माणसाच्या गळ्यात हड्डी अडकत आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहा यांना लगावला.

अयोध्येत राम का पावला नाही ?

राज्यातील जनता अनुभव बघून निर्णय घेते. गुजराती-मराठी वाद आम्हाला नकोच आहे. पण दोन गुजराती ठग, मराठी-गुजराती वादाला कारणीभूत आहेत. अयोध्येत लोक हिंदुत्ववादी, तरी तिकडचा राम भाजपला का पावला नाही. बड्या उद्योगपतींसाठी आम्ही पाठिंबा दिला नाही, असे तेथील लोकांनी खडसावून सांगितले. त्यामुळे अयोध्येत भाजपला राम पावला नाही, असाही टोला त्यांनी लगावला.

महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, मात्र ज्या गद्दारांना कोणी ओळखत नाही, त्यांना पुढे नेले. गद्दारांनी गरज होती तेव्हा खांदा वापरला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात तुम्हाला खांदा द्यायचाच. त्यावेळी घटनाबाह्य सरकार घालवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. शिवसेनेचे हिंदुत्व हे सर्वधर्मीयांसाठी आहे. भाजपचे हिंदुत्व हे निवडणुकीसाठी नंतर मित्रांसाठी आहे. शिवसेनेचा स्वार्थ एकच- महाराष्ट्राचा स्वाभिमान जगला पाहिजे. हिंदुत्वात काळानुसार काही बदल करणे अपेक्षित आहे. मात्र बुरसटलेले हिंदुत्ववादी आम्हाला नको, असेही ते म्हणाले.

घटनाबाह्य सरकार स्थापन करताना ५० खोके घेतले आणि आता बहिणींना १५०० रुपये देतायत. कोविड काळात आम्ही जे काम केले त्याचा गाजावाजा कधीच केला नाही. मात्र ‘पीएम केअर घोटाळ्या’बाबत चिडीचूप आणि आता ७० हजार कोटींचा घोटाळा लाजवतोय, फेक नरेटिव्ह जाहिरातीतून पसरवला जातोय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला खडेबोल सुनावले.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मुजोरांना गुडघ्यावर पाडले, गुजरातचे दोन ठग देशासाठी घातक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरातच्या ठगांना महाराष्ट्र काय ते दाखवा. त्यामुळे ‘चाय पे चर्चा’ नको तर दूध किती महागले ते विचारा. जनतेचा भ्रम दूर करणे तुमची जबाबदारी आहे. राजकारण्यांना लोक दार उघडत नाही, पण तुम्हाला दार उघडतात ही क्रांतीची सुरुवात आहे. निवडणुकीत आम्ही जाहीरनामा देत नाही, आमचा वचननामा असतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा!

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे. उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसैनिक घोषणा देत आहेत. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व काँग्रेसला केले.

योजनांचा पाऊस,अंमलबजावणीचा दुष्काळ

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार घोषणांचा पाऊस पाडत आहेत. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना योजनांचा पाऊस पाडला जातोय आणि अंमलबजावणीचा दुष्काळ, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे महायुतीवर केला. दरम्यान, पुढील दोन महिन्यांत मविआचे सरकार सत्तेत येताच योजना आणणार आणि त्यासाठी धोरण आणणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत व्यक्त केला.

संविधान बदलण्याचा प्रयत्न!

भूमिपुत्राला न्याय मिळालाच पाहिजे, न्याय्य हक्क मागणे गुन्हा नाही. मुस्लीम आमचे शत्रू नाहीत. बाळासाहेबांचे भाषण दाखवा, ज्यात त्यांनी मुस्लिमांना शत्रू म्हटलेय. लोकसभा निवडणुकीत समजले की हे संविधान बदलत आहेत. त्यामुळे जनतेने त्यांना धडा शिकवला. देशभक्त सगळेच आहेत, पण महाराष्ट्र रक्षणासाठी जो येईल तो आपला, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in