दोन वर्षानंतर पंढरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमली

भक्तीरस आणि पावसात होत असलेल्या भजन आणि कीर्तनात भाविक चिंब झाले आहेत.
दोन वर्षानंतर पंढरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमली

कोरोनानंतर तब्ब्ल दोन वर्षांनी रविवारी दि.१० जुलै रोजी पंढरीत आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त पंढरपुरातील चंद्रभागेचा परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. आषाढी सोहळ्यासाठी सुमारे ६ लाखांवर भाविक पंढरीत दाखल झाले असून विठूनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला आहे. भक्तीरस आणि पावसात होत असलेल्या भजन आणि कीर्तनात भाविक चिंब झाले आहेत. पंढरीत भक्तीरसाला उधाण आले आहे. दोन वर्षानंतर पंढरीत विठ्ठल-नामाची शाळा भरली असल्याने आनंदाला उधाण आले आहे.

शनिवारी सायंकाळी पावसाच्या सरी झेलत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांसह अन्य संतांच्या पालख्यांनी पंढरीत प्रवेश केला. विठ्ठल भक्तीच्या ओढीने पंढरीत आलेल्या वारकऱ्यांमुळे अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर या ठिकाणी भक्तीसागराला उधाण आले आहे. तर मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, दर्शन रांग तसेच पंढरीतील सर्व भक्तिमार्ग भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. शहरातील मठ, मंदिरे आणि धार्मिक शाळा विठ्ठल भक्तांच्या गर्दीने गजबजून गेल्या आहेत. याशिवाय शेकडो दिंड्यांनी ६५ एकरातील भक्तीसागरसुद्धा फुलून गेला आहे. ६५ एकर परिसरात तीन ते चार लाख भाविक विसावतील अशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

चंद्रभागा स्नानानंतर भाविक थेट श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जात आहेत. मुखदर्शन तसेच पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. नामदेव पायरीजवळसुद्धा दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. मुखदर्शनाची रांग लांबत चालली असून सध्या दर्शन रांग पत्रा शेडपर्यंत पोहोचली आहे. पत्रा शेडमधील सर्वच्या सर्व दहा दर्शन शेड भाविकांनी भरून गेले असून शेडमधून दर्शन रांगोपाळपूरच्या दिशेने सरकत आहे. दर्शन रांगेतसुद्धा लाखावर भाविक आहेत. श्री विठ्ठल- रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू असल्यामुळे दर्शन रांग पुढे सरकत आहे. पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी दलदल माजली आहे . पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मंदिर समितीने दर्शन रांग पूर्णपणे वॉटरप्रूफ तयार केली आहे. असे असले तरी पावसामुळे भाविकांना भिजतच दर्शनासाठी जावे लागत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in