
आपल्या अखंड राजकीय आयुष्यात काँग्रेसचा विचार ज्यांनी अखेरपर्यंत जोपासला ते साताऱ्यातील काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी सहकारमंत्री तसेच काँग्रेस या एकाच पक्षाचे व कराड दक्षिण या एकाच मतदारसंघातून सलग ३५ वर्षे आमदार राहिलेले (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र तथा काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस असलेले ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे काँग्रेसला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (शनिवारी १९) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यासाठीच्या सोहळ्याची येथे जय्यत तयारी सुरू आहे तर मंत्री अजित पवार यांचा आजचा कराड दौरा अधिकृतपणे जाहीरही झाला आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी साडेचार वाजता उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबर मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार नितीन पाटील,फलटणचे आमदार सचिन कांबळे यांच्या उपस्थितीत ॲड. उंडाळकर हे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
अशीच आणखी एक राजकीय कोलांटी उडी कराडच्या राजकीय मैदानात मारली जाणार आहे. देशाचे ज्येष्ठ नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्याकडून राजकारणाचे धडे घेऊन जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै.) विलासकाका पाटील उंडाळकर यांनी काँग्रेसचे विचार जोपासण्याचे काम आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत केले. अनेक आमिषे समोर आली तरी त्यांना लाथ मारून त्यांनी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अशी राजकीय सुरुवात करत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सलग
३५ वर्षे काँग्रेस आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. त्याचदरम्यान त्यांनी जिल्ह्यावरही पक्षाचे वर्चस्व ठेवले. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षांतर्गतच संघर्ष करावा लागला. त्याच दरम्यान त्यांना भाजपने पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांना राष्ट्रवादीत येण्याची फर्माईश केली होती. मात्र, या सर्वांकडे पाठ फिरवत व आमिषांना लाथ मारून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत पराभव पत्करला, तरी त्यांनी काँग्रेसची विचारधारा शेवटपर्यंत सोडली नाही.
शनिवारी दुपारी साडेचार वाजता कराड येथील कै. शामराव पाटील फळे, फुले, भाजीपाला मार्केटच्या मैदानावर होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात ॲड. उंडाळकर यांचा पक्षप्रवेश करणार आहेत. मात्र या राजकीय कोलांट्या उडीचा त्यांना व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना नेमका काय व कोणता राजकीय 'लाभ' होणार आहे, हे काळाच्या उदरातील 'भविष्य' वर्तमानात प्रकटण्यासाठी येथील सर्वांनाच आणखी काही काळ वाट पहावी लागेल,हे मात्र खरे. दरम्यान, राज्यातील सध्याच्या सत्तापिपासू राजकारणात सातत्याने बदल होत आहेत. सत्तेसाठी अनेकांनी राजकीय टुणटुण कोलांट्या उद्या मारत या सत्तेतून त्या सत्तेत जात आपली राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग सुरू ठेवला व यातूनच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी महायुतीची सत्ता राज्यात आहे.परिणामी राज्यात काँग्रेसची ताकद कमजोर झाली आहे.
राजकीय नेतृत्वगुण निर्माण करण्यात अपयश
काँग्रेस विचारांवरच त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत आपली निष्ठा जपली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर हे त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. त्यांनी आपल्या पिताश्रींचे कै. विलासकाका पाटील उंडाळकरांचे कराड तालुक्यावरती असलेले प्राबल्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यामध्ये त्यांना वडिलांसारखे राजकीय नेतृत्वगुण निर्माण करता आले नाहीत.