
मुंबई : एखाद्याला मराठी बोलण्यास येत नसेल तर त्याच्या कानाखाली मारणे योग्य नाही, तर त्या व्यक्तीला मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा शब्दांत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. मराठी शिकवण्यासाठी राज्यात अभ्यास केंद्र सुरू करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच लंडन मध्ये महाराष्ट्र मंडळाची इमारत राज्य सरकारने घेतली असून याठिकाणी शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिंदे सेना देणार मराठीचे धडे
मराठी भाषेचे राजकारण काही लोक करतात. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लंडन येथे मराठी अभ्यास केंद्र साकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एखाद्या व्यक्तीला मराठी येत नसेल आणि शिकण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी राज्यात मराठी अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मराठी भाषा शिकण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे.
लंडनमध्ये वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार
लंडनमधील मराठीजनांना आपल्या हक्काचे आणि स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. लंडन येथे डॉ. एन. सी. केळकर महाराष्ट्र मंडळ स्थापन केले आहे. आता लंडन येथील महाराष्ट्र मंडळाच्या ताब्यात असलेली ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करून तेथे छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार आहे.