त्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय का? ; छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांचा सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने निर्णय घ्यावा, असा घराचा आहेर उदयनराजे यांनी दिला.
त्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय का? ; छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे व्यक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी आधुनिक भारताची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. यामध्ये सर्व जातीधर्मांचा सन्मान, सर्वधर्म समभाव अशा लोकशाहीचा गाभा असलेल्या मूल्यांचा समावेश होता. शिवाजी महाराजांचे हे विचार जुनाट ठरवणे हे बुद्धिभ्रष्ट झाल्याचे आणि निर्लज्जपणाचे लक्षण आहे."

"जगातील अनेक मोठ्या योद्ध्यांनी लढाया या स्वत:चे स्रामाज्य वाढवण्यासाठी केल्या. पण शिवाजी महाराजांचा लढा हा साम्राज्य वाढवण्यासाठी नव्हे तर या देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी होता आणि आता हे लोक म्हणतात छत्रपतींचा विचार जुना झाला. शिवाजी महाराजांनी आधुनिक भारताची संकल्पना मांडली. सर्वधर्मसमभाव ही संकल्पनाही शिवाजी महाराजांनी मांडली. त्यांनी प्रत्येक जातीधर्माचा आणि प्रत्येक धर्मस्थळाचा आदर केला. इतर धर्मातील लहान मुले, स्त्रिया आणि वडीलधारी लोकांचाही त्यांनी सन्मान केला." असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या वक्तव्याची पाठराखण केल्याबद्दल उदयनराजेंनी म्हंटले की, "मी माझी भूमिका मांडली, स्पष्ट केली. मी कुठल्याही पक्षात असलो तरी राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांची हकालपट्टी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. देवेंद्र फडणवीस काय बोलले, याबद्दल त्यांना विचारा," पुढे ते म्हणाले, "भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारतात विविध जातीधर्मांचे लोक आहेत. या लोकांना एकत्र ठेवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी मांडणी केली होती, त्याच आधारावर देश अखंड राहू शकतो. भारतातील लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर शिवाजी महाराजांचा विचार सोडून चालणार नाही."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in