उदयनराजे भोसले वेटिंगवर; ३ दिवसांपासून दिल्लीत, अमित शहांची भेट होईना

उदयनराजे भोसले वेटिंगवर; ३ दिवसांपासून दिल्लीत, अमित शहांची भेट होईना

सातारा लोकसभा मतदारसंघ हा मुळात भाजपचा आहे. परंतु महायुतीत आता या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेले खासदार उदयनराजे भोसले यांची अडचण झाली आहे.

विशेष प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन तिकिटाची मागणी करणार आहेत. तीन दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. परंतु अद्याप अमित शहा यांनी त्यांच्यासाठी वेळच दिला नाही. त्यामुळे खा. उदयनराजे यांची कोंडी झाली आहे.

महायुतीत अजूनही जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यातच मनसेलाही महायुतीत सामिल करून घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे जागावाटपाचे गणित नव्याने बांधले जात आहे. त्यामुळे जागावाटपाला विलंब होत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ हा मुळात भाजपचा आहे. परंतु महायुतीत आता या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेले खासदार उदयनराजे भोसले यांची अडचण झाली आहे.

यावर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली. परंतु राज्यात उमेदवारीचा निर्णय होणार नाही, याचा अंदाज आल्याने त्यांनी थेट दिल्ली गाठली. तेथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. गेल्या ३ दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. मात्र, अद्याप त्यांची अमित शहा यांच्याशी भेट झाली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यातून मैदानात उतरण्यासाठी उदयनराजे भोसले प्रयत्नशील आहेत.

आता नरेंद्र पाटील आग्रही

महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही दावा केला आहे. तिन्ही पक्षांतील नेते येथून लढण्यास इच्छुक आहेत. त्यात राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तर जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली असून, गेल्या तीन दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. उमेदवारीसाठी ते प्रयत्नशील असतानाच भाजपचे नरेंद्र पाटील यांनी आता उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. माझा जिल्ह्यात जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे भाजपने साताऱ्याची उमेदवारी मला द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

उदयनराजेंनी ओळखावे

राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले गेल्या ३ दिवसांपासून दिल्ली मुक्कामी आहेत. मात्र, ३ दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झालेली नाही. याचे मला वाईट वाटते. एक तर ते छत्रपती आहेत आणि दुसरे म्हणजे ते राज्यसभेचे खासदार आहेत, तरीही त्यांना भेट मिळत नाही. यावरूनच त्यांनी ओळखून घेतले पाहिजे. कारण अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागेल, सांगता येत नाही. मात्र, माझा मोठा जनसंपर्क असल्याने मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in