उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे भोसले वादावर पडदा; सुरुची राडाप्रकरणी १९ एप्रिलला पुढील सुनावणी

आनेवाडी टोल नाका हस्तांतराच्या कारणावरून कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सुरुची बंगला येथे दोन्ही राजेंच्या गटात राडा झाला होता. दोन्ही गटांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रएक्स (@Chh_Udayanraje)
Published on

कराड : साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांकडून आपापल्या बाजू मांडण्यात आल्याने व आमची कोणाची काहीही तक्रार नाही, असे न्यायालयात स्पष्ट केल्याने अखेर जिल्हा न्यायालयाने नियोजित सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरून झालेल्या वादाच्या तक्रारी शनिवारी निकाली काढल्या. यामुळे दोन्ही गटांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, तब्बल आठ वर्षांनंतर सुरुची राडा प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली असून, आता ती सत्र न्यायालयात होणार आहे, त्याची सुनावणी १९ एप्रिलला होणार आहे. मात्र यावेळी खास उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकत्रित न्यायालयात उपस्थित राहिल्याने तब्बल आठ वर्षांनंतर उदयनराजे -शिवेंद्रसिंहराजे भोसले वादावर पडदा पडला असल्याचे सांगितले जात आहे.

खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह समर्थकांवर नियोजित सातारा बाजार समिती आणि सुरुची राडाप्रकरणी सुरू असलेल्या गुन्ह्यांचे कामकाज न्यायालयात सुरू आहे. शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. साळवी यांच्यासमोर कामकाज चालले. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या वतीने ॲड. शिवराज धनवडे तसेच खासदार उदयनराजेंकडून ॲड. अजय मोहिते यांच्यासह अन्य वकिलांनी काम पाहिले.

बाजार समिती राडाप्रकरणी पोलिसांनी संबंधित दावा निकाली काढावा, अशी मागणी न्यायालयास केली होती. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही फिर्यादींचे म्हणणे मागविले होते. दोन्ही बाजूंकडून दोन्ही फिर्यादींनी कोणतीही तक्रार नसल्याचे म्‍हणणे न्यायालयात मांडले. त्यावर न्यायालयाने सातारा बाजार समिती राडा प्रकरणाचा दावा निकाली काढला.

आनेवाडी टोल नाका हस्तांतराच्या कारणावरून कोजागरी पौर्णिमेच्या रात्री सुरुची बंगला येथे दोन्ही राजेंच्या गटात राडा झाला होता. दोन्ही गटांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला होता. याप्रकरणी खासदार उदयनराजे गटाकडून अजिंक्य मोहिते तसेच मंत्री शिवेंद्रसिंहराजे गटाकडून ॲड. विक्रम पवार यांनी स्वतंत्रपणे शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या घटनेवेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे जखमी झाले होते. त्यांनीही याबाबतची स्वतंत्र तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात नोंदवली होती.

logo
marathi.freepressjournal.in