आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

मराठीच्या मुद्दयावर आवाज उठवणारे, पण गेल्या दोन दशकापासून एकमेकांपासून दूर गेलेले उद्धव आणि राज हे दोघे ठाकरे बंधू एकत्र कधी येणार ? याची महाराष्ट्रातल्या तमाम मराठीजनांना आस लागून राहिली होती. पण हिंदी सक्तीविरोधात रान उठवणाऱ्या या दोन्ही बंधुंना एकाच मंचावर 'याचि देही, याचि डोळा' एकत्र पाहून मराठीजनांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण
Photo : X (@ShivSenaUBT_)
Published on

मुंबई : मराठीच्या मुद्दयावर आवाज उठवणारे, पण गेल्या दोन दशकापासून एकमेकांपासून दूर गेलेले उद्धव आणि राज हे दोघे ठाकरे बंधू एकत्र कधी येणार ? याची महाराष्ट्रातल्या तमाम मराठीजनांना आस लागून राहिली होती. पण हिंदी सक्तीविरोधात रान उठवणाऱ्या या दोन्ही बंधुंना एकाच मंचावर 'याचि देही, याचि डोळा' एकत्र पाहून मराठीजनांचा आनंद गगनात मावेनासा झाला. वरळीच्या 'एनएससीआय डोम 'मध्ये आवाज घुमला तो मराठीचाच. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूनी 'मराठीचा झेंडा' हाती घेत एकत्र येण्यावर जणू शिक्कामोर्तबच केले.

जे बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांना जमले - राज ठाकरे

हा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. संपूर्ण मैदान ओसंडून वाहिले असते. कोणाचाही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, ते मी आधीही सांगितले आहे. जवळपास २० वर्षांनंतर मी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येत आहोत. जे माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही, जे अनेकांना जमले नाही, ते आम्हा दोघांना एकत्र आणण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांना जमले, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच आपल्या भावना व्यक्त केल्या.

सन्माननीय उद्धव ठाकरे अशी आपल्या भाषणाची सुरुवात करत राज ठाकरे म्हणाले की, "हा मेळावा कुठलाही झेंडा न घेता, मराठीचा अजेंडा समोर ठेवून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राकडे कुणी वेड्यावाकड्या नजरेने पाहायचे नाही. लहान मुलांना हिंदी शिकण्याची जबरदस्ती कशासाठी करत आहात ? केवळ आमच्याकडे बहुमत आहे म्हणून आम्ही निर्णय लादणार का? तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात... रस्त्यावर आमच्याकडे सत्ता आहे," अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारलाही धारेवर धरले.

"त्रिभाषा सूत्र हे केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दूवा म्हणून आणण्यात आले. इतर कोणत्याही राज्यात हे सूत्र नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. दक्षिणेतील राज्ये तर यांना विचारतही नाही. पण महाराष्ट्र पेटून उठला की काय होते, हे सत्ताधाऱ्यांना दिसले असेल. त्याशिवाय का माघार घेतली. सद्यस्तितीत हिंदी भाषिक राज्येच आर्थिकदृष्या मागास आहेत. हिंदी न बोलणारी राज्ये मात्र आर्थिक दृष्टीने प्रगत आहेत, यावरही आम्ही हिंदी शिकायची का ? हिंदी शिकून आपली मुलं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जाणार आहेत का? २०० वर्षांपूर्वी हिंदी जन्माला आली, शिवरायांच्या काळात हिंदी नव्हती. मराठ्यांनी तब्बल १२५ वर्षे हिंद प्रांतावर राज्य केले, पण आम्ही कुणावर मराठी लादली का? सत्ताधाऱ्यांनी फक्त मुंबई वेगळी करता येते का? यासाठी भाषेला डिवचून बघू, हा प्रयोग केला. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे पाऊले टाकू. मात्र आम्ही शांत आहोत, याचा अर्थ गांडू आहोत असा होत नाही," असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले.

ते म्हणाले की, "महाराष्ट्रात राहायचे असेल तर सर्वांना मराठी आलीच पाहिजे. पण त्यासाठी विनाकारण ऊठसूट मारहाण करण्याची गरज नाही, पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. मात्र हे करताना चूक त्यांची पाहिजे. पण उगाच कुणाला मारू नका. युत्या, आघाड्या बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्यापुढेही तुम्ही सर्वांनी सावध असणं आणि सतर्क असणं गरजेचे आहे. पुढे काही गोष्टी घडतील, होतील, त्याची मला कल्पना नाही. मात्र, मला वाटतं की, मराठीसाठीची आपली ही एकजूट कायम राहायला हवी. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुन्हा एकदा साकारावे, अशी आशा, अपेक्षा व इच्छा मी व्यक्त करतो."

एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणांकडे आहे. पण, आमच्या भाषणपिक्षा एकत्रित दिसणं महत्त्वाचं आहे. मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून सर्वांनी मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली. दीपक पवार, भालचंद्र मुणगेकर, सुप्रिया ताई, महादेव जानकर सर्वजण इथे आहेत. पण आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता, तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काथ तुमच्याकडून अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाव्य शिवसेना-मनसे युतीवर जणू शिक्कामोर्तबच केले.

"आज अनेक बुवा, महाराज बिझी आहेत. कोण लिंबं कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगारे-धुपारे करत असेल, रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो वा भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांच्यासमोर आम्ही वारसदार माणून उभे ठाकलेलो आहोत," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिदि यांचाही अप्रत्यक्षपणे समाचार घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे महणाले की, "भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे, ही आधीच म्हणालो आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, हे त्यांनी सुरू केलं होतं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. मराठी बोलणारे तुमच्यापेक्षाही जास्त कट्टर, कडवट देशाभिमानी हिंदू आहेत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? फडणवीस म्हणाले की, भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल, त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाही आणि जर का तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच."

उद्धव म्हणाले की, "मुंबईतून, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले. आर्थिक केंद्र, हिरे व्यापार, मोठमोठी ऑफिसेस गेली. दिल्लीत बसलेले तुमचे दोन मालक, त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात. काही झाले की दोघांमध्ये भांडणे लावायची, हे यांचे काम. आता ते म्हणतात, यांचा 'म' मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, हा महाराष्ट्राचा म आहे. आम्ही महाराष्ट्रसुद्धा काबीज करू. सत्ता येते आणि जाते, पण आपली ताकद आपल्या एकजुटीत असली पाहिजे. दरवेळा संकट आलं की आपण मराठी एकवटतो, मग भांडत बसतो, हा नतद्रष्टपणा आपल्याला करायचा नाही. अजिबात करायचा नाही."

"काल एक गद्दार 'जय गुजरात' बोलला. अरे किती लाचारी करायची ? पुष्पा पिक्चरमध्ये हिरो दाढीवरून हात फिरवून म्हणतो, 'झुकेगा नही साला'. पण आपले गद्दार म्हणतात, 'कुछ बी बोलो, उठेगा नही साला'. अरे कसे उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं.. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर 'जय गुजरात' म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का?," अशा शब्दांत त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला.

राज ठाकरेंनी घेतली सत्ताधाऱ्यांची 'शाळा'

माघार घेतल्यानंतर त्यांनी हे सगळं प्रकरण वेगळीकडे वळवलं. ठाकरेंची मुले इंग्रजी माध्यमांमध्ये शिकली. पण दादा भुसे मराठी माध्यमात शिकून शिक्षण मंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी माध्यमात शिकून मुख्यमंत्री झाले. कोणाकोणाची मुले परदेशात शिकत आहेत त्याच्या याद्या आमच्याकडे आहेत. लालकृष्ण अडवाणी हे सेंट पॅट्रिक हायस्कूलमध्ये शिकले, पण त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेणार आहात का? एमके स्टॅलिन, कनिमोळी करुणानिधी, जयललिता, नारा लोकेश, ए. आर रहमान, दक्षिणेत सूर्या, सर्वांनी इंग्रजीत शिक्षण घेतले आहे. बाळासाहेब आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे यांनी इंग्रजीत शिक्षण घेतले आहे, परंतु ते मातृभाषा मराठीबद्दल खूप संवेदनशील होते. बाळासाहेबांनी मराठी भाषेशी कधीही तडजोड केली नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांची 'शाळा' घेतली.

मला बाळासाहेबांचे आशीर्वादच मिळत असतील - फडणवीस

मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन बंधू एकत्र आणण्याचे श्रेय मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. तिकडे विजयी मेळावा होणार आहे, हे मला सांगण्यात आले होते. पण त्या ठिकाणी केवळ रुदालीचे भाषण झाले. मराठीवर एक शब्दही न बोलता, आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सरकारमध्ये न्या, आम्हालाच निवडून द्या, असे म्हटले गेले. हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, ही रुदाली होती, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

एक मराठीप्रेमी, दुसरा सत्ताप्रेमी - एकनाथ शिंदे

मेळाव्यात एकाने मराठीबाबतची तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मळमळ. झेंडा नाही, अजेंडा नाही, असे काही लोक म्हणत होते. मेळाव्यातील एका वक्ताने ते पाळलं, तर दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा आजेंडा बोलून दाखवला. उद्धव ठाकरेंच्या भाषणात एक जळजळ आणि मळमळ होती हे दिसून आले. मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला? मुंबईतील मराठी माणसांचा टक्का का कमी होत गेला? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

स्वार्थासाठीच पुनर्मिलन - चिराग पासवान

“एकत्र येण्याची भाषा ही प्रांत अथवा धर्मासाठी नाही, तर केवळ स्वार्थासाठी आहे. हरवलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठीची धडपड आहे. भारतातील प्रत्येक माणसाला कुठेही राहण्याचा आणि कोणतीही भाषा बोलण्याचा अधिकार आहे. मी सर्व भाषांचा सन्मान करतो, पण ही विभागणीची राजकारणं मी मान्य करत नाही," अशा शब्दांत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

नव्या राजकीय समीकरणाची नांदी

तब्बल दोन दशकांच्या कालावधीनंतर उद्धव आणि राज एकाच मंचावर एकत्र येणार असल्यामुळे या सोहळ्याचे आकर्षण हे दोघेच असणार, हे निश्चित होते. पण या कार्यक्रमाला काँग्रेसचा अपवाद वगळता जवळपास विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, रासपचे महादेव जानकर, रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरात, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, कॉ. प्रकाश रेड्डी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, कॉ. अजित नवले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यामुळे ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in