आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार
मुंबई : राज्यातील फडणवीस सरकारने ‘त्रिभाषा धोरण’ आणि ‘हिंदी भाषा सक्ती’बाबत दोन सरकारी ‘जीआर’ काढले होते. त्याविरोधात मनसे व शिवसेना (उबाठा) व अन्य पक्षांनी ५ जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने हे दोन्ही ‘जीआर’ मागे घेतले. त्यामुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसेकडून शनिवारी वरळीत ‘विजयी मेळावा’ घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. ठाकरे बंधू दोन दशकानंतर एकत्र येणार असल्याने ते काय बोलणार? याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारने लादलेल्या ‘हिंदी सक्ती’ला मराठी जनतेसोबतच सर्वच राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला. या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षांनी ५ जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. पण तत्पूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘हिंदी सक्ती’चा निर्णय रद्द केला. अशा स्थितीत ठाकरे बंधूंनी ‘मोर्चा’ऐवजी ‘विजयी मेळावा’ घेण्याचे जाहीर केले.
हा विजयोत्सव ५ जुलैला वरळीच्या ‘एनएससीआय डोम’मध्ये सकाळी १० वाजता होणार आहे. हा मेळावा म्हणजे मराठी माणसाच्या एकजुटीचे विराट दर्शन असणार आहे. २९ जूनला झालेल्या आंदोलनात सहभागी झालेले सर्व समविचारी पक्ष आणि संघटनांचे नेते व पदाधिकारीही शनिवारच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.