उद्धव सेनेचे भाजपला आव्हान; जळगावात भ्रमाचा भोपळा फुटणार?

जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. १९९० नंतर जळगाव आणि रावेर हे मतदारसंघ सातत्याने भाजपाने आपल्या ताब्यात ठेवले आहेत.
उद्धव सेनेचे भाजपला आव्हान; जळगावात भ्रमाचा भोपळा फुटणार?

विजय पाठक / जळगाव :

जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. १९९० नंतर जळगाव आणि रावेर हे मतदारसंघ सातत्याने भाजपाने आपल्या ताब्यात ठेवले आहेत. मात्र आता आपण सांगू तो उमेदवार निवडून येईल हा जिल्हयातील भाजपा नेत्यांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याची स्थिती आहे. कारण जळगाव लोकसभा मतदारसंघात उध्दव सेनेने भाजपाला आम्हाला कमी लेखू नका हे दाखवत आव्हान दिले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विदयमान खासदार उन्मेष पाटील यांचे जिल्हयातील नेत्यांनी तिकीट कापत ते स्मिता वाघ यांना दिले. पाच वर्षाची खासदारकीची कारकीर्द चांगली असतांना केवळ राजकीय आकसातून तिकीट कापल्याने उन्मेष पाटील यांनी थेट उबाठा शिवसेनेत प्रवेश केला आणि उबाठाने दिलेले तिकीट नाकारत पारोळयाचे नगराध्यक्ष करण पवार यांना तिकीट देण्यास सांगितले. भाजपाने आपल्यावर केलेला अन्याय दूर करण्यासाठी करण पवार यांना निवडून आणण्याचा विडा उचलला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेसची ची साथ मिळाली आणि करण पवारांचा प्रचार सुरू झाला. या मतदारसंघात शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले चार आमदार असून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाच्या स्मिता वाघ असल्या तरी हे खुल्या दिलाने प्रचारात उतरलेले नाही.

या मतदारसंघातील विधानसभेचे शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेल्या आमदारांबद्दल मतदारात नाराजी दिसून येते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील आणि अन्य नेते आणि मुख्यत: कार्यकर्ते हे शिवसेना उमेदवारासोबत प्रचारात दिसतात. तर भाजपने नेत्यांना सोबत घेतले आहे. भाजपाने बूथपर्यंत केलेले नियोजन ही मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे आम्ही चार लाखांचा लीड घेऊ, असे गिरीश महाजन सांगतात. तर लोकांच्या मनाचा कल हा मतपेटीतून दिसेल असे उन्मेष पाटील सांगतात. या मतदारसंघात मराठा समाज मोठया प्रमाणावर असून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव या समाजावर असल्याचे बोलतांना जाणवते त्यामुळे ही मते कुठे जाणार याचा अंदाज येतो.

या निवडणुकीच्या निमित्ताने चाळीसगावचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण खान्देशच्या चारही जागांची हमी घेणारे गिरीश महाजन आणि भाजपाला धडा शिकवण्यास पेटलेले उन्मेष पाटील यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. आज तरी ही निवडणूक सोपी नाही याची जाणीव भाजपाला झाली असून पक्ष कामाला लागला आहे. भाजपाची मोठी भिस्त ही जळगाव शहरावर असून तसा प्रचार सुरू आहे. तर शिवसेनेची ग्रामीण भागाला पसंती आहे. करण पवार आणि स्मिता वाघ यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे.

महत्त्वाचे मुद्दे

भाजपाकडून जळगाव मतदारसंघात प्रचार करतांना अयोध्या येथे उभारलेले श्रीराम मंदिर , काश्मीरमधून हटवलेले ३७० कलम, देशाची सुरक्षा , देशात परत मोदींना पंतप्रधान करायचे आहे यावर भर दिला. तर शिवसेनेकडून वीस वर्षापासून या मतदारसंघात अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प, गेल्या वीस वर्षांपासून गिरणा नदीवर होऊ घातलेले सात बंधारे, युवकांना नसलेला रोजगार, पिकविमा भरपाई, शेतीच्या समस्या, चाळीसगाव शहरातील गुंडगिरी, अवैध धंदे आणि त्यास दिले जात असलेले प्रेात्साहन यावर भर दिला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in