

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे लवकरच सिंधुदुर्ग सह कोकणचा दौरा करणार आहेत. पक्षातील उणीवा दूर करून संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच सिंधुदुर्ग पुन्हा शिवसेना माय करू असा विश्वास 'उबाठा' सेनेचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.
देसाई हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. कणकवलीतील 'विजय भवन' येथे पक्षाचे नेते पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देसाई यांनी संघटनात्मक बाबींवर चर्चा केली तसेच संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर देसाई पत्रकारांशी बोलत होते. माजी आमदार व जिल्हा प्रमुख वैभव नाईक, पक्षाचे उपनेते विजय कदम, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने आपण दौऱ्यावर आलो आहोत सिंधुदुर्गात आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून सर्वप्रथम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईत परतल्यानंतर आपण याबाबत पक्षप्रमुखांशी चर्चा करू आणि या दोघांचा दौरा लवकरात लवकर आयोजित करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देसाई यांनी कार्यकर्त्यांना दिले.