

नाशिक : विकास निधीच्या नावाखाली पक्षांतराचे आमिष टाळून तुम्ही निष्ठा दाखवली, हे निश्चितच अभिनंदनीय आहे. सध्या आपला पक्ष संक्रमणावस्थेतून वाटचाल करतोय, ही वस्तुस्थिती आहे. तथापि, काही दिवस धीर धरा, आपल्या निश्चित गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नाशिक महापालिकेतील नगरसेवकांनी ‘मातोश्री’ वर ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
नाशिकचे १५ पैकी बारा उबाठा नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला लागणार असल्याच्या बातमीने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. फुटीर नगरसेवक नेमके कोण, या विषयाची उबाठा पक्षासह राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होती. त्यानंतर लगोलग पक्षाचे गटनेते केशव पोरजे यांनी स्वकीयांची वज्रमूठ आवळत आम्ही सारे सोबत असल्याचा निर्वाळा दिला होता. संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनीही नाशिकला धाव घेत नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करत ऐक्याचा नारा दिला होता. त्यानंतर आज सर्व नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले.
नाशिकचा दौरा करणार
प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी सत्तेत येऊनदेखील नाशिकमधील अनेक समस्या ‘जैसे थे’ असल्याची बाब नगसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिली. बेसुमार वृक्षतोड, खोदून ठेवलेले रस्ते, त्यामुळे झालेले अपघात आणि मृत्यू, नागरिकांची अस्वस्थता, वेळोवेळी होणारी वाहतूक कोंडी, पर राज्यातील कंत्राटदारांना दिलेली कामे असह अनेक विषयांचा उहापोह बैठकीत झाला. या संदर्भात संबंधित प्रशासकीय व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी आपण लवकरच नाशिकचा दौरा करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
बैठकीपासून पदाधिकारी लांब
नाशिकच्या नगरसेवकांना पक्ष्प्रमुख ठाकरे यांनी भेटीसाठी बोलावले असले तरी शहर अथवा जिल्ह्यातील कोणताही पदाधिकारी सोबत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. आजच्या बैठकीपासून पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले का, अशी चर्चादेखील रंगत आहे.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)