मोदींच्या गरम सिंदूरची थंड कोल्ड्रिंक झाली; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

भारतीय जनता पार्टी म्हणजे बोगस जनता पार्टी, मतांची चोरी केल्याशिवाय महाराष्ट्र जिंकूच शकत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपची मतचोरीची पोलखोल करत भाजपचे ढोंग उघडे पाडले, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र Photo : (@ShivSenaUBT_)
Published on

मुंबई : भारतीय जनता पार्टी म्हणजे बोगस जनता पार्टी, मतांची चोरी केल्याशिवाय महाराष्ट्र जिंकूच शकत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपची मतचोरीची पोलखोल करत भाजपचे ढोंग उघडे पाडले, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून सत्ताधाऱ्यांचे गरम सिंदूर थंड कोल्ड्रिंक झाले का, असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरेंनी मोदींना केला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष जगन्नाथ अभ्यंकर यांच्या विधानपरिषद सदस्यत्व वर्षपूर्तीनिमित्त कार्यपुस्तिकेचे प्रकाशन ठाकरेंच्या हस्ते शनिवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे पार पडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांच्यासह विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

"देशातील सध्याचे वातावरण पाकिस्तान व चीनचा निषेध करायचा की नाही, याबाबत साशंकता निर्माण करणारे आहे. रशिया अफगाणिस्तानमध्ये घुसल्यावर ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला. भारत मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार आहे. एकीकडे 'ऑपरेशन सिंदूर' राबवायचे आणि दुसरीकडे सामने खेळायचे हा प्रकार निषेधार्थ आहे. सत्ताधारी न शिकल्याचा हा परिणाम आहे. शाळेत न गेल्यामुळे चांगले शिक्षक मिळाले नाहीत. परिणामी देशभक्ती त्यांना कळाली नाही," असा चिमटाही त्यांनी काढला. देशातील घुसखोरीवरूनही ठाकरे म्हणाले की, "बांगलादेशच्या शेख हसीना यांना मोदींनी आसरा दिला. भ्रष्टाचाऱ्यांनाही आसरा देत असल्यामुळे या सर्वांची कीव येते."

कबुतर, हत्ती आणि कुत्र्यांसाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत, ही बाब चांगली आहे. परंतु, पहलगामवेळी माणुसकी कुठे जाते? गरम सिंदूर वाहतो, असा दावा पंतप्रधान करतात. आता तोच भारत देश पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळणार, क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का, अशी विचारणा करत ठाकरेंनी बीसीसीआयचे जय शहांवर टीका केली. देशाच्या सैनिकांनी शौर्य गाजवल्याचे श्रेय घेणारे, सोफिया कुरेशी यांची मानहानी करणाऱ्या भाजपवर ठाकरेंनी टीकेची झोड उठवली. दरम्यान, जगभरात शिष्टमंडळ जाऊन भारतच्या मागे उभा राहण्याची विनंती केली. मात्र एकतरी देश आपल्या बाजूने उभा राहिला का? असा प्रश्न ठाकरेंनी विचारत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली.

राहुल गांधींनी भाजपला उघडे पाडले

निवडणुकीच्या काळात शिक्षकांना कामे देण्यात येतात, यावरूनही ठाकरेंनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. "शिक्षकांनी मतचोरी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. हजेरीपट घेऊन बसायची तुम्हाला सवय असल्याने दुबार मतदान करणाऱ्यांना जाब विचारा. भाजप लोकांमधून प्रामाणिकपणे महाराष्ट्रात दोन वेळा निवडून येऊच शकत नाही. त्यांनी ज्या जागा जिंकल्या, तेथे मतचोरी कशी केली? हे राहुल गांधींनी उघडे पाडले. त्यांच्या चोरीचा मामला उघड करून त्या लोकांचा बुरखा फाडला. आता त्यांचे ढोंग आणि सोंग दोन्ही उघडे पडले असून अशा लोकांच्या हातातून देश वाचवायचा आहे," असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे.

logo
marathi.freepressjournal.in