
सुखात सोबत असतात ते रिश्ते, दु:खात सोबत असतात ते फरिश्ते. कितीही शहा आणि अफजलखान येऊ द्यात. शिवसैनिक सोबत असताना मला चिंता नाही. कर्नाटकची निवडणूक तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच चेहऱ्यावर लढवली ना. ते कमी पडेल म्हणून जय बजरंगबलीची घोषणा दिली, पण लोकांनी तुमच्या सत्तेच्या खुर्चीला आग लावलीच ना. आता भाजपची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. देशात आता भाजपेतर पक्ष एकत्र येणार असून, ती देशप्रेमींची एकजूट ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाशिबीर वरळी येथे पार पडले. त्याच्या समारोपाच्या भाषणात उद्धव ठाकरे बोलत होते. गद्दार आईच्या कुशीवर वार करून गेले. जे गेले त्यांना जाऊ द्यात. आज यांचे दिल्लीत मुजरे मारणे सुरू आहेत. असा लेचापेचा मिंधा महाराष्ट्र हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता, असा टोला लगावताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आपल्या घरात येऊन फोडाफोडी करताहेत. सत्तेची मस्ती आहे ही. तुमचा फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. जा, मणिपूरमध्ये जाऊन या. अमित शहांनी जाऊन काय केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जातात, मग मणिपूरला का जात नाहीत. मोदींनी मणिपूरला जाऊन दाखवावेच, असे आव्हान त्यांनी दिले. शिवसेनाप्रमुख म्हणायचे, माझ्यासोबत आठ-दहा असतील तरी चालतील. युद्ध निष्ठेवर लढले जाते. पानिपतच्या युद्धात पण कुणी शहा होता. मराठ्यांमध्ये फूट पाडा ही काही आजची नीती नाही. अयोध्या पौळ यांचा उल्लेख करताना यापुढे माता-भगिनीवर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवू नका,’’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्ही ढकलले म्हणून महाआघाडीत गेलो
ठाकरे म्हणाले, ‘‘हिटलर पण असाच माजला होता. त्याने अगोदर मीडियावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली. विरोधकांचा छळ सुरू केला, सत्य दडपून टाकले. आम्ही म्हणू तेच सत्य, हा त्याचा होरा होता. आम्ही हिंदू आहोतच. तुम्ही ढकलले म्हणून आम्ही महाआघाडीत गेलो. अमित शहांना प्रश्न विचारले तर बोबडी वळते. ३७० ला आमचा पाठिंबाच आहे, पण अजूनही निवडणुका घेऊ शकत नाही, याचे उत्तर द्यावे. तिथला हिंदू सुरक्षित नाही, अजूनही काश्मिरी पंडित परतलेला नाही. मणिपूरला काय गोमूत्र शिंपडणार आहात? आम्ही मोदींचा चेहरा लावला म्हणता, तुम्ही बाळासाहेबांचा चेहरा लावला,’’ असा घणाघात केला.