आम्हाला संपवून दाखवाच! उद्धव ठाकरेंचा नागपुरातून घणाघात; म्हणाले- अमित शहा म्हणजे ‘अहमदशहा अब्दाली’

काही दिवसांपूर्वी बाजारबुणगे इथे येऊन गेले. औरंगजेब संघटनेचे प्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे, असे ते सांगतात. मी औरंगजेब तर तुम्ही कोण? तुम्ही तर अहमदशहा अब्दाली. अमित शहा यांनी चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन बंद दाराआड मला आणि शरद पवार यांना...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नागपूर : काही दिवसांपूर्वी बाजारबुणगे इथे येऊन गेले. औरंगजेब संघटनेचे प्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे, असे ते सांगतात. मी औरंगजेब तर तुम्ही कोण? तुम्ही तर अहमदशहा अब्दाली. अमित शहा यांनी चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन बंद दाराआड मला आणि शरद पवार यांना संपवण्याची भाषा केली. त्यांनी आता बंद दाराआडचे धंदे बंद करावेत. हिंमत असेल तर मैदानात या आणि छत्रपती शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवून दाखवा, असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी नागपुरातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कडाडून टीका केली. “२५ ते ३० वर्षे आम्ही भाजपसोबत होतो. तेव्हा शिवसेनेची कधी भाजप झाली नाही, मग आता काय म्हणता, शिवसेनेची काँग्रेस झाली? जागावाटप अंतिम टप्प्यात आले असताना, मला एकनाथ खडसेंचा फोन आला होता. आपल्याला पुढे सोबत जाता येणार नाही, ही युती तोडावी लागेल. वरून तसे आदेश मिळाले आहेत, असे त्यांनी सांगितले. मी म्हणालो, ठीक आहे आणि नंतर तुमच्या साक्षीने निवडणूक लढवून जिंकून दाखवले. भाजपचे हे हिंदुत्व नाही, हे थोतांड आहे. आम्हाला दळभद्री गोमूत्रधारी हिंदुत्व मान्य नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर बांधण्यात आलेल्या पुतळा कोसळल्याची घटना गेल्या महिन्यातच घडली होती. या घटनेनंतर आता चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात पुतळ्याच्या निकृष्टतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावर उद्धव म्हणाले की, “मालवणची घटना लाजिरवाणी आहे. पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत. मिंधे दाढी खाजवत म्हणतात, वाऱ्याने पुतळा पडला. अहो वाऱ्याने तुमची दाढी नाही ना उडत. मग महाराजांचा पुतळा पडतो. बेशरमपणाने सांगता, वाऱ्याने पडला.”

एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचा नाही

सुनील केदार हे माझे जुने सहकारी आहेत. त्यानंतर थोडासा दुरावा झाला, आता परत आपण एकत्र आलेलो आहेत. मात्र एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचा नाही. पाठीमागून वार करायचा नाही, असे ठरवले आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसलाही अप्रत्यक्ष इशारा दिला. रश्मी बर्वे यांना जात प्रमाणपत्र नाकारले. न्यायालयाने ते अवैध ठरवले. आता अवैध ठरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना झुंजवत ठेवून मुख्य शहरातील मोक्याचे भूखंडाचे श्रीखंड बावनकुळेंसारखे लोक खात आहेत. आपले सरकार आल्यावर आपल्या माणसांना नवे भूखंड देऊ, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आता विधानसभा जिंकायची आहे

उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकसभा जिंकली, आता विधानसभा जिंकायची आहे. लोकं मेली तरी चालतील, पण यांना सत्ता हवी. परंपरेने दसरा मेळावा घेणार, त्यानंतर मी महाराष्ट्र फिरणार आहे. बऱ्याच वर्षांनी मी इथे आलोय. मीडियाला काम करू द्या. त्यांच्यामुळे दिल्लीचे ठग आपल्याला ऐकतील. आपल्या दैवताच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यासाठी मला बोलावले, त्याबद्दल धन्यवाद.

गद्दारांना ५० खोके आणि बहिणींना फक्त १५००?

मी एका ठिकाणी गेलो होतो, तिथल्या एका महिलेला विचारले कसे चालू आहे, त्यावर त्या म्हणाल्या, १५०० रुपयांत काय होते? एवढ्या पैशांत घर पण चालत नाही. मुलांचे शिक्षण १५०० रुपयांत होणार आहे का? गद्दारांना ५० खोके आणि आम्हाला १५०० रुपये, असे महिला सांगतात. २०१४ ला मोदी यांचा आम्ही प्रचार करत होतो. ते १५ लाख देणार होते. त्याचे १५०० का झाले? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.

ठाकरेंचे शिवसैनिक नितेश राणेंविरुद्ध आक्रमक

नागपूरला उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो शिवसैनिक विमानतळावर गोळा झाले असताना दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे अमरावती जिल्ह्यात अचलपूरला जाण्यासाठी दुपारी नागपूरला विमानाने पोहचले. नितेश राणेंना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाहताच ते संतप्त झाले व त्यांनी राणेंच्या विरोधात आक्रमक होत जोरदार घोषणबाजी केली. गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी नितेश राणे यांना मागच्या प्रवेशद्वारातून बाहेर काढले व गाडीमध्ये बसवून रवाना केले.

logo
marathi.freepressjournal.in