"वाटेल त्याच्या डोक्यात जिरेटोप घालू नका..." उद्धव ठाकरेंनी प्रफुल पटेलांना सुनावलं

महिलेवर अत्याचार केल्यास छत्रपती शिवाजी महाराज शिरच्छेद करायचे आणि तुम्ही....
उद्धव ठाकरेंची प्रफुल पटेलांवर टीका
उद्धव ठाकरेंची प्रफुल पटेलांवर टीकाप्रातिनिधिक फोटो

नाशिक: लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्पासाठी राज्यात २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. शिवसेना उबाठा आणि महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. काल नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्याबद्दल प्रफुल पटेलांना उद्धव ठाकरेंनी चांगलंच सुनावलं. महाराजांचा इतिहास समजून घ्या, वाटेल त्याच्या डोक्यात महाराजांचा जिरेटोप घालू नका, असं उद्धव ठाकरेंनी प्रफुल पटेलांना सुनावलं.

जिरेटोपाचं दर्शन घेण्याचीही तुमची लायकी नाही...

काल प्रफुल पटेलांनी नरेंद्र मोदींच्या डोक्यात जिरेटोप घातला होता. यावरून उद्धव ठाकरेंनी प्रफुल पटेलांना चांगलंच झापलं. काल महाराजांचा जिरेटोप, आज शेतकऱ्यांची गांधी टोपी...रोज टोप्या बदलणारा माणूस देशाचा पंतप्रधान तुम्हाला पाहिजे? असा प्रश्न त्यांनी लोकांना विचारला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "प्रफुल पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात महाराजांचा जिरेटोप घालू नका. तुम्ही प्रफुल पटेल असला तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल. कोणाच्या डोक्यांवर तुम्ही जिरेटोप ठेवताय? मोदींच्या? महाराजांची बरोबरी करायची त्यांची पात्रता आहे का? शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो. त्यांचं राज्य कसं चालत होतं? कुणी महिलेवर अत्याचार केला तर जिथल्या तिथं त्याचे हातपाय तोडायचे, मग तो रांझाचा पाटीला असो वा कुणी असो....आणि मोदी काय करतायत...

शिवराय महिलेवर अत्याचार केल्यास शिरच्छेद करायचे आणि तुम्ही...

मनिपूरमध्ये महिलांची धिंड निघाली, तिकडे जातच नाहीत. मोदी आणि शहांची तिकडे जायची हिंमतच नाही. जिथे शिवराय महिलेवर अत्याचार केल्यास शिरच्छेद करायचे आणि तुम्ही तिथे (मनिपूर) जाऊ पण शकत नाही...महाराजांचा जिरेटोपाला हात लावायची काय त्याचं दर्शन घ्यायचीही मोदी तुमची लायकी नाही."

"बरं ते कुणाचा प्रचार करतायत..इकडं जो उमेदवार आहे त्याचे व्हिडीओ फिरतायत. असा ज्यांचा उमेदवार आहे, तो महाराजांचा जिरेटोप घालू शकतो? कर्नाटकामध्ये प्रज्वल रेवण्णा, महिलांवर अत्याचार करणारा माणूस, बलात्काराचे व्हिडीओ काढणारा माणूस मोदी निर्लज्जपणे सांगतायत रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत..यांची आणि महाराजांची बरोबरी होऊ शकते? हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान आहे."

...ते डोकं त्या लायकीचं नाही-

प्रफुल पटेल आज म्हणाले, छत्रपतींचा अपमान करायची आमची इच्छा नव्हती, पण यापुढे दक्षता घेऊ...म्हणजे तुम्हाला कळलंय की तुम्ही ज्यांच्या डोक्यात महाराजांचा जिरेटोप घातला, ते डोकं त्या लायकीचं नाही...

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in