"सेवा करणारे तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर...": अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात उद्धव ठाकरे बरसले

मी तुमच्यासोबत नेता म्हणून नाही, तर तुमचा भाऊ म्हणून आलो आहे. सरकारमध्ये जरा संवेदना असतील, तर ते तुमच्या मागण्या मान्य करतील. नाहीतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या मागण्या आम्ही पुरवणार, असे आश्वासन देखील त्यांनी अंगणवाडी सेविकांना दिले.
"सेवा करणारे तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर...": अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात उद्धव ठाकरे बरसले

"समाजाची सेवा करणारे तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर, विचार करा केवढा आवाज येईल. असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा मशाल पेटते. ही मशाल कोणालाही खाक करु शकते", असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मागील महिनाभरापासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.

अंगणवाडी सेविकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "मी तुमच्यासोबत नेता म्हणून नाही, तर तुमचा भाऊ म्हणून आलो आहे. सरकारमध्ये जरा संवेदना असतील, तर ते तुमच्या मागण्या मान्य करतील. नाहीतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या मागण्या आम्ही पुरवणार. तुम्ही बालकांना आहार देता, पण सरकारने तुम्हाला कुपोषित केलंय. तुम्हाला काहीच मिळत नाही."

कोरोनामध्ये माझं नाव जरुर झाले. पण त्याचे खरे श्रेय़ अंगणवाडी सेविकांना आहे. कारण त्या काळात तुम्ही घरोघरी जाऊन लोकांची काळजी घेत होतात. यांच्याकडे सरकार आणण्यासाठी खोके आहेत. पण आशाताई-अंगणवाडी सेविकांना द्यायला पैसे नाहीत, असे म्हणत, हे सरकार तुमचे आहे का? असा सवाल देखील त्यांनी अंगणवाडी सेविकांना केला.

आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जयंती आहे. 'क्रांतीतीज्योती', 'महात्मा' लावावं अशी माणसेच आता उरली नाहीत. आज राज्यात अनेक बालक कुपोषीत आहेत. तर, दुसरीकडे गुटगुटीत मंत्र्याचे फोटो आपण जाहिरातींवर पाहतो. खेकडे खाऊन गुटगुटीत झालेले मंत्री आहेत, असे म्हणत त्यांनी नाव न घेता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर बोचरी टीका केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in